पुणे : तंबाखू मूळची अमेरिकेतील वनस्पती. साधारणता सतराव्या शतकात भारतामध्ये पोर्तुगीज लोकांकडून आणली गेली. ही वनस्पती भारतामधलं महत्त्वाचं नगदी पीक जरी असलं, तरी मानवाच्या आरोग्याला आणि सभोवतालच्या पर्यावरणाला, जैवविविधतेला या परकीय पिकाचा मोठा धोका आहे. हे धोके लक्षात घेता या पिकाला योग्य ते विकल्प उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे मत वनस्पती संशोधक डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले.
इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे (आयडीए) आणि बायोस्फिअर्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोध दिनाच्या पूर्वसंध्येला जनजागृती करण्यासाठी वेबिनार आयोजित केला होता. यामधे तंबाखूचा निसर्ग इतिहास, पर्यावरणावरील दुष्परिणाम, मुखकर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग, तसेच व्यसनाधीनतेचे घातक परिणाम अशा वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी समाजप्रबोधन केले.
आयडीएच्या सामाजिक व प्रतिबंधात्मक दंतचिकित्साविभाग प्रमुख व दंतरोगतज्ज्ञ डाॅ. भक्ति दातार म्हणाल्या, “गालाचे आतील पडदे, जिभेच्या खालील भाग, टाळू, ओठ तसेच हिरडीलाही कर्करोग होऊ शकतो. दुर्दैवाने तरुण मुली व तरुण स्त्रियांमधे तंबाखूसेवनाचे प्रमाण वाढत आहे. यासाठी शाळा-महाविद्यालयांमधे जनजागृती वाढवणे गरजेचे आहे. थुंकण्याच्या प्रवृत्तीने संसर्गजन्य आजारांचाही धोका वाढतो.”
पुण्यातील मोदी क्लिनिकचे संचालक आणि फुप्फुसरोगतज्ज्ञ डाॅ. महावीर मोदी यांनी तंबाख़ूसेवनावाटे शरीरात प्रवेश करणारी घातक रसायने, त्यांचे दुष्परिणाम तसेच फुप्फुसाचा कर्करोग, काळा दमा यावर भर दिला. सिगरेट ओढणाऱ्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींमधेदेखील छातीचे विकार दिसून येऊ शकतात. गर्भवती स्त्रीच्या गर्भावर देखील त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात, असे ते म्हणाले.
आयडीए पुणे शाखेच्या अध्यक्षा डाॅ. मेघा पागे यांनी सर्वांना तंबाखू विरोधी दिन फक्त आजच नाही तर कायमस्वरूपी आचरणात असावा असे आवाहन केले.
अध्यक्षस्थान आयडीए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डाॅ. नितीन बर्वे यांनी भूषविले. आयडीए पुणे शाखेच्या सचिव डाॅ. अपर्णा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.