पुणे : जगभर माजी विद्यार्थी एकत्र येऊन अनेक शिक्षण संस्था चालवत आहेत. समाजातील अतिशय गरीब पण प्रचंड गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांनी ‘हेल्प नीडी’ ही योजना राबविणे आवश्यक असून, या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांनी हातभार लावावा, असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या ऑनलाइन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात जावडेकर बोलत होते. या वेळी डीईएसच्या नियमित मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, खासदार गिरीश बापट, उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, टिळक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, नियोजित माजी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देवधर आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ''शाळा हे आई वडिलांइतकेच महत्त्वाचे केंद्र आहे. ज्याबद्दल बोलता येत नाही. मात्र मुलांची जडणडण करण्याचे काम शाळा आणि शिक्षक करीत असतात.
कुंटे म्हणाले, समाजाची स्थिती बदलू शकतील असे स्मार्ट विद्यार्थी घडविण्याची गती वाढविण्याचा प्रयत्न डीईएस तर्फे केला जात आहे.
----------------------
रमणबाग शाळेतील विविध विकासकामांसाठी खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी जावडेकर यांनी जाहीर केला, तर उद्योजक प्रमोद चौधरी यांनी ७५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला.