Pune Accident Case : पुणेअपघात प्रकरणात आता ससून रुग्णालयात समितीकडून चौकशी करण्यात येत आहे. अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्यानंतर ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सापळे यांच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेराफार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी भीमराव हाळनोर, डॉ.अजय तावरे आणि वॉर्ड बॉय अतुल नामदेव घटकांबळे या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने डॉ पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांचाही समावेश आहे. मात्र डॉ. पल्लवी सापळे यांच्या नियुक्तीला ठाकरे गटाने विरोध केला आहे. सापळेंवर जे जे रुग्णालयात भ्रष्टाचार केल्याचे आरोप असल्याचे ठाकरे गटाने म्हटलं आहे. त्यामुळे ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
"चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत? सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे दिले. मुळात डॉ. सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी, यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता. यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेत घोषणाही केली होती. ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे म्हणजे सरकारच्या हेतू वर शंका आणणारे आहे? ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी," अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
"उलट सापळे यांच्यावरील आरोपांचे पुढे काय झाले, हे सरकारने सांगावे. हे असले अधिकारी नेमून हेच सिद्ध होते की पुणे प्रकरणी सरकार अजूनही गंभीर नाही. असे अधिकारी नेमले असतील तर तपासाअंती काय समोर येईल, हे कोणीही आत्ताच सांगू शकेल. त्याला चौकशीच्या ड्रामा करण्याची गरज नाही. मुळात ससूनचे डॉक्टर, त्यांनी इमान विकून केलेला कारभार याचा आमदार सुनील टिंगरे यांच्याशी काही संबंध आहे का, हे देखील तपासले गेले पाहिजे. हे आमदार अपघात झाल्यावर का पोलिस ठाण्यात जाऊन बसले होते, याचे उत्तर अजून त्यांनी दिलेले नाही! म्हणून चौकशीची व्याप्ती वाढली पाहिजे," असेही अंबादास दानवे म्हणाले.