लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जालना जिल्ह्यातील अंबड येथे सुरू केलेले ऊस संशोधन केंद्र अधिक प्रगत करण्याचा निर्णय वसंतदादा साखर संस्थेच्या (व्हीएसआय) कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला.
मराठवाडा, विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे केंद्र फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितलेे जात आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १५) संस्थेच्या मांजरी येथील मुख्यालयात ही बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
व्हीएसआयने अंबडमध्ये नुकतेच ऊस संशोधन केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी ऊसशेतीवरील प्रयोग केले जात आहेत. मराठवाडा, विदर्भात या प्रकारचे एकही केंद्र यापूर्वी नसल्याने अंबड केंद्राचा चांगला उपयोग होत असल्याचे सांगण्यात आले. “ऊस उत्पादकांना सध्याच्या काळात फायदेशीर ठरेल असे संशोधन व्हावे. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग करून पाहावेत. संस्था नेहमीच अशा संशोधनाला मदत करेल,” असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
या केंद्राचा विकास होण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. संशोधकांंना काम करण्यासाठी अधिक इमारती तसेच आधुनिक साहित्य उपलब्ध झाले पाहिजे अशी चर्चा बैठकीत झाली. कार्यकारिणीने यासाठीच्या खर्चास मंजुरी दिली.