पुणे : सहारा समुहाने लोणावळ्याजवळ उभारलेला बहुचर्चित आलिशान अॅम्बी व्हॅली प्रकल्प अखेर गुंडाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीची विक्री करण्यासाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले. त्यानंतर अॅम्बी व्हॅलीच्या संचालक मंडळाला अॅम्बी व्हॅली चालविण्याबाबत अडचणी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रकल्पच बंद करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाने घेतला. या ठिकाणी काम करणा-या अडीच हजार कर्मचा-यांपैकी तब्बल १,५७६ कर्मचा-यांना कामावरुन कमी करण्यात आले असून त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि मावळ तालुक्यांमध्ये सहारा समुहाकडून तब्बल ७ हजार ६२१ एकरामध्ये अॅम्बी व्हॅली प्रकल्प उभारण्यात आला आहे. सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी क्रिकेटपटूंना बक्षीस म्हणून येथील घरे दिल्याने हा प्रकल्प चर्चेत आला होता. अनेक चित्रपट कलावंत, उद्योगपतींची घरे येथे आहेत.सहारा समूह आर्थिक अडचणीत सापडल्यापासून या प्रकल्पाच्या भवितव्याविषयी शंका निर्माण झाली होती. सुब्रतो रॉय हे त्यांच्या जामिनासाठी आवश्यक असलेले पाच हजार कोटी रुपये भरू शकले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाच्या अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश एप्रिलमध्ये दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाला त्यासाठी प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लिक्विडेटरने काम सुरु केल्यामुळे सर्व नफा लिक्विडेटरकडे जमा करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे संचालक मंडळांना खर्च भागविणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.येथील कर्मचा-यांचा तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही. संचालक मंडळाने १,५७६ कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. उर्वरित ९२४ कामगार हे अॅम्बी व्हॅलीमुळे बाधित झालेल्या गावांमधील आहेत. त्यांनाही कमी केले जाणार असून पुढील पंधरा दिवसांचा पगार दिला जाणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर १९ आॅक्टोबरला अॅम्बी व्हॅली पूर्णपणे बंद होणार आहे.- अॅम्बी व्हॅली सिटी बंद झाली असली तरी येथे ज्यांच्या खासगी मालमत्ता आहेत ते येथे येऊ शकणार आहेत. येथील इंटरनॅशनल स्कूलही सुरू राहणार आहे. सध्या येथे ७० ते ८० विद्यार्थी शिकत आहेत.
पुण्यातील अॅम्बी व्हॅली प्रकल्प गुंडाळला, कर्मचा-यांना काढून टाकल्याने तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 10:45 PM