पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येपासून ते मंगळवारी जयंतीदिनी रात्री उशिरापर्यंत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात जनसागर उसळला होता. महामानवापुढे नतमस्तक होण्यासाठी रांगा लागल्या होत्या. तब्बल वीस तासांहूनही अधिक वेळ हा उत्साह कायम होता. पिंपरी-चिंचवड शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ही शहराची एक वेगळी ओळख आहे. या पुतळ्याचे अनावरण १२ एप्रिल २००२ करण्यात आले. तेव्हापासून दर वर्षीच्या १४ एप्रिलला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे जनसागर उसळतो. सोमवारी रात्री अकरापासूनच नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या वतीने आयोजित महोत्सवात भीमगीतांचा कार्यक्रम सुरू होता. येथेही अनेकांनी हजेरी लावली होती. मध्यरात्री बारा वाजता पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, काळेवाडी, नेहरूनगर, भाटनगर, तळवडे आदी भागांतील तरुण ज्योत घेऊन दौड करीत पिंपरी चौकात दाखल झाले. घोषणांच्या आवाजात बाबासाहेबांना अभिवादन केले. विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. तसेच मंगळवारी सकाळपासूनच अभिवादनासाठी पिंपरी चौकात गर्दी होण्यास सुरुवात झाली. अनेकांनी भगवान बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमांचे घरी पूजन केले. त्यानंतर त्यांची पावले पिंपरीच्या दिशेने वळली. पीएमपी बस, रिक्षा अथवा पायी पिंपरीकडे मार्गक्रमण करीत होते. त्यामुळे दिवसभर पिंपरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गर्दी दिसत होती. लहानग्यांसह आबालवृद्ध पिंपरीत आले होते. पांढऱ्या रंगाची पँट आणि शर्ट यांसह डोक्यावर निळ्या रंगाचा फेटा, शर्टच्या खिशाला बाबासाहेबांचा फोटो असा पुरुषांचा पोशाख होता; तर महिलांनीही पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठीची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मेणबत्ती प्रज्वलित करीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले जात होते. एकमेकांना भेटल्यानंतर ‘जय भीम’ अशी घोषणा दिली जात होती. प्रत्येकामध्ये उत्साह संचरला होता.सकाळी दहाच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुतळा परिसरात हेलिकॉप्टर नजरेस पडले अन् सर्वांच्याच नजरा आकाशाकडे वळल्या. पुतळ्यावर फुलांची उधळण होताच पुतळा परिसरात उपस्थित असलेल्यांनी घोषणा दिल्या. यामुळे उपस्थितांचा उत्साह आणखीनच दुणावला.दुपारच्या वेळी काही प्रमाणात गर्दी ओसरली होती. दरम्यान, शेजारील मंडपात भीमरायांच्या गीतांचा कार्यक्रम सुरू होता. चारच्या सुमारास ऊन कमी होताच गर्दी वाढू लागली. कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चारच्या सुमारास चौकातील छोटी वाहने, तसेच हातगाड्या तेथून हटविल्या. सहाच्या सुमारास मोरवाडी ते खराळवाडीपर्यंतचा सेवा रस्ता बंद करण्यात आला. या सेवा रस्त्यावरील वाहतूक ग्रेड सेपरेटरमार्गे वळविण्यात आली. केवळ पादचाऱ्यांनाच पिंपरी चौकाच्या दिशेने सोेडले जात होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास परिसरातील मिरवणुका पिंपरी चौकाकडे येण्यास सुरुवात झाली. ट्रॅक्टरवर फुलांची आकर्षक सजावट करून त्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा, तसेच प्रतिमा ठेवली होती.या ठिकाणी लावण्यात आलेल्या दुकानांमध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. बाबासाहेबांच्या दुर्मीळ प्रतिमाही येथे पाहायला मिळत होत्या. लहान-मोठ्यांसह सर्वच या प्रतिमा बारकाईने पाहत होते. चिंचवड स्टेशन, मोहननगर, काळभोरनगर, नेहरूनगर, भाटनगर, काळेवाडी, कासारवाडी, वल्लभनगर आदी भागांतील मिरवणुका एकापाठोपाठ पिंपरी चौकात येत होत्या. बाबासाहेबांचा जयघोष व भीमगीतांचा गजर सुरूच होता. (प्रतिनिधी)मोबाईलमध्ये छबीबाबासाहेबांचा जयघोष आणि येथील उत्साह पाहून अनेकांचा आनंद द्विगुणीत होत होता. येथील चित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकांचे हात मोबाईलसह उंचावले जात होते. पुस्तक खरेदीस गर्दी पुस्तकेवाचत राहा, त्यामुळे ज्ञानात भर पडत राहते, असा संदेश दिलेल्या बाबासाहेबांवर आधारित असलेली पुस्तके खरेदी करण्यास मोठी गर्दी झालेली दिसत होती. मित्रमंडळी, नातेवाइकांच्या भेटीजयंतीनिमित्त या ठिकाणी आलेले अनेक मित्रमंडळी व नातेवाईक यांची वर्षभराने भेट झाली. त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर उद्यानात बसून त्यांच्यामध्ये गप्पा रंगल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसत होते. विविध दुकानेमंगळवारी पिंपरी चौकाला यात्रेचे स्वरूप आले होते. खेळणी, खाद्यपदार्थ, पुस्तक विक्री, घरगुती वापराचे साहित्य, फोटो विक्री आदींची दुकाने या ठिकाणी थाटण्यात आली होती. मंगळवारी या दुकानांमधील वस्तू विक्रीच्या माध्यमातून मोठी उलाढाल झाली.