पुणे : मारवाडी फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्यात येणार आहे.पुरस्कार वितरण १४ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर आॅफ कॉमर्स येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी माहिती दिली. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे असणार आहेत. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील आणि ज्येष्ठ विचारवंत माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ५ लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, की संपूर्ण देशाचा विचार करून समाजात जे जे उपेक्षित आणि वंचित घटक आहेत, त्यांना शक्ती प्रदान करणे हे फाऊंडेशनचे प्रथम कर्तव्य आहे. या दिशेने जो राष्ट्रीय यज्ञ सुरू आहे, त्यात समिधा टाकून आपले योगदान देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलित पीडित जनांचे कंठमयी डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा अखिल भारतीय स्तरावरील पुरस्कार देण्यात येत आहे. यापूर्वी डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव, नामदेव ढसाळ, आर. एस. गवई, डॉ. यशवंत मनोहर, शरदचंद्र पवार, मार्टीन माक्वान, सदानंद फुलझेले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
रावसाहेब कसबे यांना आंबेडकर स्मृती पुरस्कार
By admin | Published: October 13, 2016 2:38 AM