पुणे : धनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला दहा जागा देईल, त्यांच्याशी युती केली जाईल. अन्यथा राज्यातील ४८ जागांवर उमेदवार उभा करू, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.पंढरपूर येथे झालेला धनगर समाज मेळावा आणि पुणे येथील भटक्या विमुक्तांची सभा या दोन परिषदानंतर पुढील वाटचाल ठरविण्यासाठी दोन्ही परिषदांच्या आयोजकांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राजकारणात घराणेशाही प्रस्थापित झाली असून लोकशाही शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याकरिता प्रयत्न झाले पाहिजेत. धनगर, माळी, ओबीसी आणि मुस्लिम समाजाकरिता प्रत्येकी दोन जागा पक्षामार्फत देण्यात येतील. त्यामुळे दहा जागा देणाऱ्या पुरोगामी पक्षासोबत आम्ही जाऊ. त्या पार्श्वभूमीवर २७ जूनपासून कोल्हापूर येथून राज्यव्यापी दौरा काढणार असून चार ते पाच ठिकाणी सभा घेण्यात येतील. शेतकºयांना किमान हमीभाव मिळणारी व्यवस्था असावी, शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यात यावे, शिक्षणाच्या वेगवेगळया संधीची उपलब्धता, रोजगाराच्या संधी या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून त्यावर आॅक्टोबरपर्यंत आराखडा तयार करण्यात येईल.>..तर, पवार यांच्यासोबत जाणार नाहीमाजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना मी पुरोगामी समजत नाही. त्यांनी काही विरोधी पावले उचलली आहेत. पवारांनी काही सुधारणावादी भूमिका मांडली तर त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला जाईल. पवारांनी फुले पगडीचा स्वीकार केला याचा आम्हाला आनंद आहे. पुणेरी पगडी ही पेशवाईचे प्रतीक असल्याने त्याला आमचा विरोध आहे, असेही आंबेडकर म्हणाले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या अटकसत्राबाबत आंबेडकर म्हणाले, संभाजी भिडे हे संघाच्या उच्च फळीतील असल्याने त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. पी. बी. सावंत, कोळसे पाटील हे माजी न्यायमूर्ती असल्याने त्यांना पोलीस हात लावू शकत नाहीत. मी सामान्य कार्यकर्ता असल्याने माझ्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.
आंबेडकरांना हव्यात लोकसभेच्या दहा जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 5:15 AM