--
नीरा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला राज्यघटना तर दिलीच पण या समाजाला एक चांगला मार्ग दाखवला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी केले.
नीरा (ता. पुरंदर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती बुधवारी सकाळी अकरा वाजता साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी काकडे बोलत होत्या.
नीरा येथे दर वर्षी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जयंती साध्या पद्धतीने साजरी झाली. यावेळी ग्रामपंचायत समोरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय बौद्ध महासभ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) व (आठवले) गट या भीम अनुयायी संघटनांसह, भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान व राष्ट्रीय चर्मकार महासंघा शाखा नीरा तसेच ग्रामस्थांच्या वतीने भीम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या ठिकाणी उपसरपंच राजेश काकडे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, अनंता शिंदे, संदीप धायगुडे, वैशाली काळे, माधुरी वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, भारतीय बौद्ध महासभेचे दादा गायकवाड, आरपीआयचे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे, स्वप्नील कांबळे, कुमार मोरे, विजय शिंदे, सुदाम बंदगर, सूर्यकांत कांबळे, सुनील पाटोळे, दिलीप पाटोळे, मंडल अधिकारी संदीप चव्हाण, ग्रामसेवक मनोज डेरे आदींनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
धम्मवंदना दिनेश गायकवाड यांनी घेतली. सूत्रसंचलन दादा गायकवाड यांनी केले, तर आभार अनिकेत सोनवणे यांनी मानले.
--
फोटो क्रमांक : १४ नीरा अभिवादन
फोटोओळ : नीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक फुलांच्या सजावटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ.