पुणे पदवीधरसाठी चार व शिक्षक मतदारसंघासाठी चार अशी तालुक्यात एकूण आठ मतदान केंद्र होती. पदवीधर मतदारांची एकूण संख्या १९०२ तर शिक्षक मतदारांची संख्या ७४५ होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंभे खुर्द, जनता विद्या मंदिर घोडेगाव, महात्मा गांधी विद्यालय मंचर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या चार ठिकाणी आज शांततेत मतदान पार पडले. सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर लगेचच मंचर येथे मतदारांनी रांगा लावल्या होत्या.मतदान करण्याची प्रक्रिया वेळखाऊ होती.पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागत होते.पदवीधर मतदारसंघासाठी जास्त उमेदवार असल्याने मतपत्रिका देताना वेळ लागत होता. त्यामुळे मतदारांना अनेक वेळ रांगेत ताटकळत थांबावे लागले. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.काही शिक्षक मतदारांना पदवीधर व शिक्षक मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी मतदान करायचे असल्याने त्यांची धावपळ झालेली दिसली. मतदान केंद्रावर आलेल्या मतदाराची तपासणी केली जात होती. त्यांचे तापमान व ऑक्सीजन पातळी तपासल्यानंतर नोंद घेऊन त्यांना मतदानासाठी पुढे पाठवले जात होते.
मतदान केंद्राबाहेर ठराविक अंतरावर गोल वर्तुळ काढून त्यात मतदारांना उभे राहण्याची सूचना केली होती. त्याद्वारे सोशल डिस्टन्स पाळले जात होते. पाच वाजता मतदान संपले डिंभे येथील केंद्रावर शिक्षक मतदारसंघासाठी ८५.२२ टक्के तर पदवीधर मतदारसंघासाठी ६८.४५ टक्के मतदान झाले. घोडेगाव येथे शिक्षक मतदारसंघासाठी ७७.१९ टक्के तर पदवीधर मतदारसंघासाठी ७५.३३ टक्के मतदान झाले. मंचर येथील केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी ८५१ मतदारांपैकी ६१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण टक्केवारी ७१.५१ राहिली आहे. तर शिक्षक मतदारसंघातील ३०४ मतदानापैकी २४२ मतदान झाले एकूण ७९.६० टक्के मतदान झाले आहे. पारगाव येथे पदवीधर मतदारसंघातील ४८४ मतदानापैकी ३५६ मतदान झाले. एकूण ७३.५५ टक्के मतदान झाले आहे. तर शिक्षक मतदारसंघातील १३० मतदानापैकी १११ मतदान झाले. एकूण टक्केवारी ८५.३८ असे मतदान झाले आहे. तालुक्यात मतदान शांततेत पार पडल्याची माहिती अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांनी दिली. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या मंचर येथे चांगले मतदान झाले आहे.
--
फोटो : ०१मंचर पदवीधर मतदान
फोटोखाली:पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. मंचर येथे सकाळीच मतदारांची रांग लागली होती.