पुणे : “आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील कामांचा निपटारा वेळेत करा. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा. अपूर्ण कामे गतीने मार्गी लावा,” अशा सूचना कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केल्या.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत सोमवारी (दि. ८) ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समिती सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप आदी या वेळी उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यातील विविध कामांसंदर्भातल्या सूचना या वेळी वळसे पाटील यांनी दिल्या. शासनस्तरावरील प्रस्तावांसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. चक्रीवादळात झालेल्या हिरड्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.