आंबेगाव: लांडेवाडी येथील बिबट्या व तरसाने नागरिकांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शिंगवे ( ता. आंबेगाव ) येथे गाढवे वस्तीत दोन वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी दहा वाजता घडली. मुलाला बिबट्याने पळवले असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. कृष्णा विलास गाढवे असे मुलाचे नाव आहे.
शिंगवे गावात गाढवे वस्तीत सोमवारी सकाळी कृष्णा विलास गाढवे हा दोन वर्षांचा मुलगा घराच्या ओट्यावर खेळत होता. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो अचानक बेपत्ता झाला. घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो कोठेही मिळाला नाही. त्यानंतर स्थानिकांनी घराच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. परंतु कृष्णा सापडला नाही. त्यानंतर कृष्णाला बिबट्यानेच पळवून नेल्याचा संशय बळावला. येथील परिसरात बिबट्यांचा वावर अनेक दिवसांपासून आहे. उसाचे क्षेत्र अधिक आहे. शेतकऱ्यांना अनेक वेळा एका वेळेस दोन तीन बिबटे दृष्टीस पडले आहेत, त्यामुळे मुलाला बिबट्याने पळवले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पोलीस पाटील गणेश पंडित, नितीन वाव्हळ, प्रकाश गाढवे यांनी वन विभाग व मंचर पोलिस ठाण्याला घटनेची खबर दिली. वनपाल विजय वेलकर, एन .एम.आरूडे, वनरक्षक पूजा पवार, डी.एस. शिवशरण, संपत भोर, शरद जाधव, यांनी उसाच्या शेतामध्ये पहाणी केली. परंतु बेपत्ता कृष्णाचा शोध लागला नाही.