पुणे : जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदलीतून वाचण्यासाठी रातोरात काही शिक्षक संघटनेची पदाधिकारी झाले होते. असाच प्रकार आंबेगाव तालुका अंतर्गत शिक्षक बदलीत घडला आहे. एका शिक्षकाने संघटनेचा पदाधिकारी म्हणून बदलीतून सूट मिळविली आहे. विशेष म्हणजे, ही संघटनाच बोगस असल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाची शाळा असताना एका उर्दू शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असल्याचा दाखला या शिक्षकाने दिला होता. मात्र, तालुक्यांतर्गत बदलीत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला सूट मिळत नाही. असे असताना हा प्रकार घडला. त्यामुळे आता आंबेगाव तालुका शिक्षक बदली प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांमध्ये पेसा कायदा धुडकावून नियमबाह्य बदल्या करून आदिवासी भागातील सडकेचीवाडी, न्हावेड, ढकेवाडी या शाळा रिक्त ठेवल्या. याबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषदेने एक चौकशी समिती नेमून अहवाल तयार केला; मात्र तो प्रशासन समोर ठेवत नव्हते. यामुळे यात काय लपले आहे, अशी उत्सुकता सर्वांनाच होती.आदिवासी भागावर जाणीवपूर्वक अन्याय केला व जिल्हा परिषदेने याची चौकशी करूनही अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ आदिवासी जनतेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी यांनी एक दिवसाचे उपोषण केले. या वेळी त्यांना सदर शिक्षकांना कारवाईच्या नोटिसा दिल्याचे सांगून आठ दिवसांत ठोस कारवाईचे अश्वासन देण्यात आले. मात्र, याने त्यांचे समाधान न झाल्याने आपण हा विषय राज्यपालांकडे घेऊन जाणार असल्याचे आढारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.अहवालाची मागणी केली असतानाही सदर अहवाल प्रशासन का देत नाही? असा प्रश्न पत्रकारांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना विचारला असता, आम्ही तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ. ए. एस. चिखले, गटशिक्षणअधिकारी आर. एन. पालेकर व शिक्षक संघटनेच्या नावाखाली सूट मिळविलेले शिक्षक मोबीन मुंडे तसेच इतर दोन शिक्षकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांची उत्तरे आल्यानंतर प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करायची हे ठरवेल, असे सांगितले. मात्र, यावर समाधान न झाल्याने पत्रकारांनी असे अहवालात काय लपले आहे, की आपण तो जाहीर करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा देसाई यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सदर अहवालाचे वाचन करण्यास सांगितले. यात हा प्रकार उघड झाला. मोबीन मुंडे या शिक्षकाने उर्दू शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे पुरावे देऊन या बदलीतून सूट मिळवली होती. मात्र, ही संघटनाच बोगस असल्याचे समोर आले आहे. तसेच, तालुक्यांतर्गत बदलीत शिक्षक संघटनेच्या पादधिकाऱ्याला सूट मिळत नाही. असे असतानाही मोबीन शेख याला या बदलीतून सूट मिळाली आहे.त्याचप्रमाणे आदिवासी क्षेत्रात रिक्त पदे ठेवता येत नाहीत. असे असताना सडकेचीवाडी, न्हावेड, ढकेवाडी या शाळांतील शिक्षकांची पदे रिक्त ठेवण्यात आली. (प्रतिनिधी)
आंबेगाव शिक्षक बदलीतही बोगस संघटनेचा पदाधिकारी!
By admin | Published: October 04, 2016 1:33 AM