बारामती : ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे सध्या बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. आमदारकी, मिनी आमदारकीप्रमाणेच ग्रापंचायत निवडणुकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण जोरात सुरू आहे. पक्ष एक असला, तरी गटातटाच्या राजकारणामुळे ही रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यातील जिरायती भागाची मागील चार वर्षांपासून दुष्काळाने पाठ सोडली नाही. मात्र, येथील ग्रामपंचायत निवडणुकांवर दुष्काळाचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. बारामती तालुक्यातील प्रामुख्याने प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन गटांमध्ये निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी चार-चार गट तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे हौशे-नवशे-गवशे आपले नशीब अजमावत आहेत. जिरायती भागात पावसाने ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम वाया गेला. या भागाचे बरेचसे अर्थकारण खरिपावर अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भागात गंभीर आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही या भागात महत्त्वाचा आहे. येथील जनतेने मागील महिन्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही केली होती. मात्र, त्याकडे प्रशासन व गावकारभाऱ्यांनी दुर्लक्ष केले. जिरायती भाग दुष्काळात होरपळत असताना ग्रामपंयाचत निवडणुकांमध्ये मात्र पाण्यासारखा पैसा वाहताना दिसत आहे. निवडणुका बिनविरोध करून खरे तर येथील दुष्काळी परिस्थितीवर उपायोजना करणे गरजेचे होते; मात्र तसे होताना दिसत नाही. गावातील पत, प्रतिष्ठा दाखविण्यासाठी निवडणुका हे चांगले माध्यम गावकारभाऱ्यांना मिळाले आहे. वाटेल तेवढा पैसा, जेवणावळी, दारू यांमुळे सांगकाम्या कार्यकर्त्यांमध्येही वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्य मतदारही या निवडणुकांमध्ये मताला किती भाव फुटणार, याचीच वाट पाहत आहेत. याला अपवादही आहेत; मात्र तुरळकच. विकास आणि सोयीसुविधा यांवर फक्त प्रचार सभांमधूनच बोलले जाते. प्रत्यक्षात गावकीच्या राजकारणात जात, पै-पाहुणे आणि मत खरेदी या गोष्टींनाच जास्त महत्त्व आल्याचे दिसते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ग्रामपंचायतीसह इतर ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात आला. त्यामध्ये स्थानिक मतभेद बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करण्यात अनेकांना यश आले. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नीरावागज ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे. तीन पॅनल एकमेकांसमोर उभे होते; परंतु स्थानिक पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी ५ जागा देऊन निवडणूक बिनविरोध केली. नवा आदर्श त्यामुळे निर्माण झाला आहे. तालुक्यात ४५८ सदस्यांची निवड होणार४७ पैकी ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, तर दोन ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. एकूण १६५ प्रभागातून ४५८ ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार आहे. १,७०५ उमेदवारी अर्ज वैद्य ठरले होते. ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. आज मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका टाळण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला. बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या नीरावागज गावाची ग्रामपंचायत निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. तर, खांडज गावाच्या प्रभाग ५ मधील दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिला वर्गातून शारदा राजेंद्र ढवळे व मागासवर्गीयमधून बापट निवृत्ती कांबळे बिनविरोध झाले आहेत. कांबळे यांच्या विरोधातील सागर हनुमंत कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला, तर ढवळे यांच्या विरोधात उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. तर, सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यांमध्ये दोन महिला, दोन पुरुष यांचा समावेश आहे. प्रभाग १ मधून उपदेश अशोक भोसले, प्रभाग ३ मधून मायादेवी मोहन देवकाते, विराज हनुमंत देवकाते, शोभा उत्तम माने या सोनेश्वर रयत सहकार पॅनलमधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. १३ पैकी ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
वातावरण गरमागरम
By admin | Published: July 24, 2015 4:35 AM