लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंबिल ओढ्याच्या संरक्षक भिंतीसाठी फेर निविदा काढावी लागल्याने याबाबत महापालिका किती गांभीर्याने विचार करते हे दिसून आलेच पण त्याच वेळी या कामासाठी काही कोटी रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. पुरानंतरचा यावर्षीचा हा तिसरा पावसाळा असून महापालिका पुन्हा त्या जीवघेण्या घटनेची वाट पाहतेय की काय असे वाटू लागले आहे.
सध्या गाजत असलेल्या आंबिल ओढ्यात पूर संरक्षक भिंत बांधण्याचे कंत्राट वर्षभरापूर्वी १५ कोटी १३ लाख रूपयांना बहाल करण्यात आले होते. तेच काम आता फेरनिविदेनंतर आता १८ कोटी ५९ लाख रूपयांमध्ये करण्यात येणार आहे. साडेतीन कोटींच्या या फटक्याशिवाय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणखी सुमारे १ कोटी रूपयांचा फटका महापालिकेला बसला आहे.
आंबिल ओढ्याला २५ सप्टेंबर २०१९ रोजी आलेल्या महापुरात मोठ्याप्रमाणावर जिवित आणि वित्त हानी झाली होती. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने समक्ष जागा पाहणी करून पूर संरक्षक भिंत मे-२०२० पूर्वी बांधण्याचे आदेश दिले. त्यानुसार सुमारे ४६२ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्या आराखड्यातील, के. के. मार्केट ते पद्मावती पुल आणि गजानन महाराज चौक ते वैंकुंठ पर्यंतच्या कामाचे अंदाजपत्रक सुमारे ७ कोटी २८ लाखांचे होते. तर, पेशवे तलाव ते पद्मजा पार्क व पद्मावती पुल ते गजानन महाराज चौक दरम्यान भिंत बांधण्याचे काम सुमारे १० कोटी ५२ लाखांचे होते. ही दोन्ही कामे, सावी इंन्फ्रास्ट्रक्चर्सने, ऑक्टोबर २०२० मध्ये पूर्वगणनपत्राच्या १५.०३ टक्के कमी दराने घेतली. मात्र वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर मुदतीत कामे सुरू न केल्याने महापालिका प्रशासनाने मार्च २०२१ मध्ये फेरनिविदा काढली. त्यात, निखिल कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने ही कामे अनुक्रमे ४ आणि ४.६४ टक्के जादा रकमेने करण्यास होकार दिला आहे.
आंबिल ओढ्यातील पूर संरक्षक भिंत बांधण्याचे जे काम केवळ वर्षभरापूर्वी ठेकेदार अंदाजित रक्कमेपेक्षा १५.०३ टक्के कमी दराने करावयास तयार होता तेच काम आता फेरनिविदेनंतर ४ टक्के जादा दराने करणार आहे. याचा सरळ अर्थ असा की, गतवर्षाच्या तुलनेत तब्बल सुमारे २० टक्के जादा खर्च येणार आहे.
पहिला ठेकेदार काम न करता निघून गेल्यास त्याचे, सुमारे १ कोटी ६ लाख रूपये अतिरिक्त डिपॉझिट महापालिकेने नियमानुसार जप्त करावयास हवे. तसे न केल्यामुळे हाही आर्थिक फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे. एकूणच या प्रकाराबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
....................................
.................
पहिला ठेकेदार हा कोरोना कालावधीमुळे काम करू शकला नाही त्यामुळे आम्ही फेरनिविदा प्रक्रिया राबवली.
- सुश्मिता शिर्के, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका.
.........................
कोट
...........
आम्हाला संरक्षक भिंतीचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करू द्या, असे आम्ही शेवटपर्यंत विनवत होतो. पण असो. आमचे दुदैव, यापेक्षा ज्यादा बोलणे उचित होणार नाही.
- विकास पाटील, संचालक, सावी कंस्ट्रक्शन्स.
.................,,,,,,,,,......,,,.,,....,,,
गेल्या ८- १० महिन्यात सिमेंट, लोखंड आदींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आम्हाला ज्यादा दराने निविदा भरावी लागली.
- योगेश पासलकर, निखिल कंस्ट्रक्शन्स.
........................,,...............
पहिल्या कंत्राटदाराने नियत मुदतीत काम न केल्याने आम्हाला त्यांचे काम खंडित करून फेरनिविदा प्रक्रिया करावी लागली. अतिरिक्त अनामत रक्कम जप्तीबाबत लवकरच निर्णय होईल.
- कुणाल खेमनर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.
......................................