पुणे : सप्टेंबर महिन्यात आंबिलओढ्याला आलेल्या पुरात घराचे आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झालेल्यांना तातडीने २० हजारांची मदत द्यावी, तीन महिन्यांचा शिधा द्यावा, घराची आणि पाण्याच्या नळांची डागडुजी करून द्यावी, या मागण्यांसाठी दांडेकर पूल वसाहत परिसरातील पूरग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला. त्यामुळे काठच्या वसाहती आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पर्वती पायथ्यापासून खालील भागातील अंदाजे तीनशे ते साडेतीनशे घरांचे नुकसान झाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या पुरामुळे घरांची पडझड झाली, काही घरांच्या भिंतीला तडे गेले. घरातील जीवनावश्यक साहित्य आणि शालेय वस्तूंचे नुकसान झाले. सायकल, मोटारसायकल, रिक्षा, हातगाडी, टपरी, किराणा दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, या मागणीसाठी आंबिलओढा परिसर पूरग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डॉ. निखिल एडके, रवी पुर्णे, हनुमंत फडके, आलम शेख, वंदना मोरे, लता आईवळे, मुक्ता माने यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. डॉ. एडके म्हणाले, की पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून वीस हजार रुपयांची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तीन दिवसांत ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. ओढ्याला लागून असलेली अनेक घरे धोकादायक झाली आहेत. या घरांची दुरुस्ती होईपर्यंत त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन केले पाहिजे. घरांची डागडुजी, नळदुरुस्ती आणि विद्युत मीटरची दुरुस्ती सरकारने करून दिली पाहिजे. परिसरात डेंग्यूचे ९ रुग्ण आढळले आहेत. त्यावरही तातडीने उपाययोजना कराव्यात.
आंबिलओढा पूरग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:44 PM
गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला. त्यामुळे काठच्या वसाहती आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले...
ठळक मुद्देमदतनिधी देण्याची मागणी : धोकादायक घरातून नागरिकांचे पुनर्वसन करा