लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : राजुरी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका व मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर भोरवाडी गावच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी झाला. अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत.राजुरी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ही पुण्याकडून नाशिकच्या दिशेने येत होती. या वेळी एक मोटार मंचर येथून नेरुळ (नवी मुंबई) येथे निघाली होती. मोटार आणि रुग्णवाहिकेची पुणे-नाशिक महामार्गावर भोरवाडी गावच्या हद्दीत धडक झाली. दोन्ही गाड्यांची धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.मोटारचालक प्रशांत निघोर हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. राजुरी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून आरोग्य कर्मचारी प्रवास करत होते. अपघातात दीपा कारभारी गुंजाळ, हेमलता खंडागळे, चालक प्रकाश इंगळे (रा. राजुरी) हे जखमी झाले. दोन जखमींची नावे समजली नाहीत. मागील एका गाडीतून अन्य आरोग्य खात्याचे कर्मचारी रवींद्र चव्हाण, प्रमोद मोकर, सुदर्शन हे येत होते. त्यांनी जखमींना मदत केली. अपघातातील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. इतर जखमींवर उपजिल्हा रुग्णालय व खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
रुग्णवाहिका मोटारीची धडक; आठ जखमी
By admin | Published: May 07, 2017 1:44 AM