पुणे (धनकवडी): नेहमी रुग्णांना जीवदान देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते ती म्हणजे रुग्णवाहिका. संपर्क केल्यानंतर काही क्षणात घटनास्थळी दाखल होत रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असते. मात्र, कोरोना काळात रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. यामुळे या यंत्रणेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. असाच एक प्रसंग काल पुुुण्यात घडला.
रुग्णवाहिका न मिळाल्याने चार तास रस्त्याच्या कडेला एक मृतदेह पडून राहिल्याची दुर्दैवी घटना बिबवेवाडी येथील इंदिरानगर लोअर येथे मंगळवारी घडली. खिशात सापडलेल्या डायरीवरून किसन मारुती केदार, (वय ६०) असे त्या मृत व्यक्तीचे नाव असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. केदार हे मंगळवारी सकाळी अकरा वाजता इंदिरानगर येथील पदपथावरून चालत निघाले असता ते चक्कर येवून पडले. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील हवालदार विश्वनाथ शिंदे हे घटनास्थळी आले. त्यांनी बरेच ठिकाणी फोन करून शेवटी १०८ रूग्णवाहिकेला बोलवले. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर १०८ रूग्णवाहिका आली तोपर्यंत ती व्यक्ती मृत झाल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले. रुग्णवाहिकेेने मृतदेह नेण्यासाठी १०८ मधील कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. त्यांनी १०२ नंबरवर संपर्क करण्यास सांगितले. १०२ या नंबर सह पोहिस हवालदार शिंदे यांनी अनेक ठिकाणी पुन्हा प्रयत्न सुरू केले. तब्बल चार तासांनी महापालिकेने पाठवलेली रूग्णवाहिका आली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. परंतू या घटनेमुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात धनकवडी परिसरात घरी मृत्यू झालेल्या दोन कोरोनाबाधीतांचे अंत्यसंस्कार स्वतः सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख आणि आरोग्य कर्मचार्यांना करावे लागले होते. चव्हाणनगर येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. मृत घोषित करणारी यंत्रणा, मृत्यूचा दाखला देणारी व्यवस्था आणि पोलिस पंचनामा या बाबी सहाय्यक आयुक्त देशमुख यांना कराव्या लागल्या आणि तब्बल सात तासानंतर त्या वृध्देचा अंत्यसंस्कार पार पडला. --------------------------------------------