---
डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी किसान सभेच्या माध्यमातून आहुपे ते डिंभा या भागात १०८ रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर उपसंचालक आरोग्य विभाग यांच्या कार्यालयाने नुकतीच या भागाची पाहणी केली आहे. दुर्गम भागातील या खोऱ्यात आरोग्यसेवेसाठी लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
आंबेगाव तालुका किसान सभा समितीने उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांना आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आरोग्य समस्याविषयक मागण्यांचे निवेदन पाठविले होते. यामध्ये या भागासाठी १०८ रुग्णवाहिकेची मागणी केली होती. हे प्रश्न न सुटल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले होते. त्यामध्ये किसान सभा संघटनेचे शिष्टमंडळ व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी हे एकत्रित या भागाची पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार १०८ रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे, जिल्हा रुग्णालयाचे समन्वयक पल्लवी येवले, १०८ चे आंबेगाव, जुन्नरचे पर्यवेक्षक विवेक बेलवटे यांनी एकत्रित तिरपाड, अडविरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची पाहणी केली.
पुढील चार दिवसांत या भागात १०८ रुग्णवाहिकेची गरज असल्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार आहे. यावेळी किसान सभेचे राजू घोडे, अशोक पेकारी, बाबू आंबवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
----------
सोबत-१७ डिंभे रुग्णवाहिका चर्चा
ओळी- आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी दुर्गम आहुपे खोऱ्यात १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यासंदर्भात आढावा घेताना जिल्हा रुग्णालयातील अधिकारी.