पुणे : ‘‘स्वातंत्र्यापूर्वी भारताकडे लक्ष दिले जात नव्हते. पण स्वातंत्र्यानंतर मात्र हळूहळू भारताकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले. जेव्हा भारताने पोखरणला अणुचाचणी केली, त्या वेळी मात्र साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले. अमेरिकेनेही गांभीर्याने पहायला सुरवात केली. आपली वाटचाल अतिशय चांगली असून, लवकरच भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनेल,’’ असा विश्वास भारताचे माजी राजदूत नवतेज सरना यांनी व्यक्त केला.
सरना म्हणाले,‘‘स्वामी विवेकानंद यांच्यामुळे जगाला एक वेगळे स्थान मिळवून दिले. भारत अध्यात्मामध्ये उच्च स्थानावर असल्याची ओळख स्वामी विवेकानंद यांनी करून दिली. त्यानंतर १९६० मध्ये मात्र भारताकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यानंतर १९८०-९० मध्ये मात्र भारताची ओळख निर्माण होत होती. संगणक क्षेत्रातील ब्रेन म्हणूनही भारताकडे गेल्या काही वर्षांमध्ये पाहिले जाऊ लागले. पोखरणला अणुचाचणी झाल्यानंतर तर आपल्याकडे सर्वजण आदराने पाहू लागले. त्यानंतर अमेरिकेने देखील भारताला प्राधान्य दिले. कारण तेव्हा चीन हा उगवती महासत्ता समोर येत होती. त्याच्या समोर भारताला उभे करण्यासाठी आणि मोठी बाजारपेठ म्हणून अमेरिकेने भारताला पाठिंबा देणे सुरू केले. आता पंतप्रधानांनी अमेरिकेला भेट दिली आणि अनेक संरक्षण, आयात-निर्यातीबाबतच्या धोरणांवर सही केली आहे. हे भविष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.’’ पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि सरहद यांच्यावतीने मंगळवारी दुपारी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अमेरिकेमध्ये आता राजकीय व्यक्ती म्हणून देखील भारतीय लोकं कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेच्या उच्च पदांवर भारतीय व्यक्तींनी स्थान मिळविले आहे. हे भारतीय गुणवत्तेचे यश आहे.- नवतेज सरना, भारताचे माजी राजदूत