पुणे : पुण्यातील खासगी रुग्णालयातील नर्सला सायबर चोरट्यांनी मैत्रीच्या जाळ्यात ओढून अमेरिकेतून डॉलर, सोने पाठवल्याचे सांगून तब्बल १३ लाख २० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय नर्सने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार डॉ. मार्क बक्षी नावाच्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नर्सचा आणि सायबर चोरट्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून परिचय झाला. यानंतर सायबर चोरट्याने फोन आणि व्हॉट्सअप मेसेज करून ओळख वाढवली. सायबर चोरट्याने फिर्यादी यांच्यासाठी गिफ्ट पार्सल म्हणून अमेरिकन डॉलर आणि सोने पाठवतो असे आमिष दाखवून हे पार्सल मिळवण्यासाठी कस्टम ड्युटी, मनी लाँड्रिंग शुल्क, डॉलरचे भारतीय पैशांमध्ये बदलण्यासाठी, भारतीय सरकारचा टॅक्स म्हणून फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर १३ लाख २० हजार ऑनलाइन पाठवायला सांगून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे करत आहेत.