पिंपरी : कुदळवाडी, चिखली येथील अमित इंजिनिअर्समध्ये वेतन करार एक वर्षापासून प्रलंबित आहे. तसेच, कामगारांना सुविधा दिल्या जात नसल्याची तक्रार अमित इंजिनिअर्स वर्कर्स युनियनने कामगार उपायुक्त कार्यालयाकडे केली आहे. या कंपनीत एकूण ९६ कामगार असून, त्यांतील १५ जण कायम कामगार आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात वेतन करार संपला आहे. वर्ष होऊनही अद्याप व्यवस्थापनाकडून वेतन वाढ करार केला गेला नाही. अनेक कागारांची हाताची बोटे काम करताना तुटली आहेत. त्यांना कोणतीही भरपाई दिली गेली नाही. वेतन वेळेवर दिले जात नाही. तसेच, नाश्ता आणि जेवण दिले जात नाही. सेफ्टी शूज, गणवेश, हँडगोल्व्ह्ज आदी साहित्य दिले जात नसल्याची तक्रार युनियनतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात कंपनीचे मुख्य संचालक संजय बडवे यांनी सांगितले, ‘‘कंपनीत यापूर्वी वेगळी संघटना होती. उत्पादनात वाढ करण्याच्या अटीवर वेतनकरार करण्याचे त्यावेळी ठरले होते. त्यानुसार उत्पादनवाढीशी निगडीत वेतनवाढ करण्यास व्यवस्थापन तयार आहे. मात्र, कामगार या विषयावर बोलण्यास तयार नसल्याने मार्ग निघत नाही. कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत.’’(प्रतिनिधी)
अमित इंजिनिअरिंगचा वेतन करार प्रलंबित
By admin | Published: June 30, 2015 12:32 AM