- राजू इनामदार
पुणे : देशाचे नेतृत्व करणाऱ्या अमित शहासारख्या केंद्रीय नेत्याला मुंबईत येऊन महापालिकेविषयी भूमिका घ्यावी लागते यातच शिवसेनेची ताकद लक्षात येते. महापालिका आम्ही मिळवणारच कारण सगळी महत्वाची केंद्र ते अहमदाबादला हलवत आहेत, मग मुंबई यांना हवी तरी कशाला अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट शहा यांच्यावर हल्ला चढवला.
पुण्यातील गणेश दर्शनासाठी म्हणून दानवे सोमवारी दुपारी पुण्यात आले होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यावेळी त्यांच्यासमवेत होते. शिवसेनेला जमीन दाखवू असे शहा म्हणाले याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले, आम्ही जमिनीवरच आहोत, ते आकाशात आहेत. त्यांनी आम्ही तिथेच आकाश दाखवू. मोदी लाट होती तरीही मुंबई महापालिका मुंबईकरांनी आमच्याकडेच दिली. आता तर ते मुंबईच्या जीवावर उठले आहेत. मराठी माणूस हे सहन करणार नाही.
डॉ. गोर्हे यांनीही यावेळी भाजपवर हल्ला चढवला. मी राजकीय बोलते असे म्हटले जाते, पण आम्ही एका राजकीय पक्षाचे सदस्य आहोत व त्यावर टीका झाली तर बोलणारच. मोदी यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींचा राजीनामा घ्यायचे ठरवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनाच वाजपेयी यांची भेट घ्यायला लावली व मोदी हवेतच असे ठामपणे सांगितले. हा सगळा इतिहास आता भाजपचे लोक विसरले. आज त्यात ठाकरे यांच्या मुलाला जमीनीत गाडण्याची भाषा करता हे जनता विसरणार नाही असे गोर्हे म्हणाल्या.
सन १९६६ पासून बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा घेतात. आता त्यावर कोणी हक्क सांगत असेल तर लोक पाहतीलच. तिथे मेळावा शिवसेनेचाच होईल असे दानवे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी त्यांनाच विचारायला हवे. भाजप राज यांना पुढे करत आहे याबाबत विचारले असता दानवे यांनी याच राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडीओ असे म्हणत मोदी यांच्यावर टीका केली असा निर्देश दानवे यांनी केला. तानाजी सावंत किंवा शिंदे सेनेतील मंत्री काहीही बोलतात ती सगळी मस्तीची भाषा आहे, ५० खोक्यांची भाषा आहे, महाराष्ट्रात अशी भाषा सहन होणारी नाही.
राज यांनी भाजप पुढे करत आहे यावर बोलताना डॉ. गोर्हे म्हणाल्या, माझ्याकडे आज गणपतीची पूजा आहे. त्यात गुरूजी सुपारी देण्यास ठेवण्यास सांगतात, सुुपारी देण्याला असा पवित्र अर्थ आहे. त्यामुळे सुपारीला काही वेगळा अर्थ असेल ते घेण्याचे कारण नाही, चांगला अर्थ घ्यावा. उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला करून त्यांना मुंबई गिळकृंत करून महाराष्ट्र गुजरातच्या घशात घालायचा आहे अशी टीका डॉ. गोर्हे यांनी केली.