पुणे : गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर असून सकाळीच त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध गणपती आणि आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. अहमदनगरमधील सहकार दौरा संपवून त्यांनी पुण्यात कार्यक्रम घेतले आहेत. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले आहे. शहा यांनी आज पुणे येथे आज श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आरती केली.
''महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो...आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो... असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.''
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.