मंचर (पुणे) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत पातळी सोडून टीका केली आहे. त्यामुळे शाह यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करावी, असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंचर पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.
यासंदर्भात मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत पातळी सोडून टीका करत आहेत. ठाकरे यांचा उपमर्द करत आहेत. उद्धव ठाकरे यांचा केलेला अपमान आम्हास सहन होत नाही. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या भावना अधिक तीव्र व संतप्त होत आहे.
ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक ॲड. अविनाश रहाणे, तालुकाप्रमुख दिलीप पवळे, घोडेगाव शहरप्रमुख नंदकुमार बोऱ्हाडे, मंचर शहर संघटक विनोद घुले, विभाग संघटक विजय जाधव, महिला आघाडी तालुका संघटक सुरेखा निघोट, नीलम गावडे, बबन तोत्रे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी निवेदन स्वीकारले.