पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत व्यासपीठावर अजित पवार एकत्र आले. यावेळी अजित पवार यांनी शाह यांचं कौतुक केलं. त्यानंतर, देवेंद्र फडणवीसांनीही अजित पवारांची री.. ओढल्याचं पाहायला मिळालं.
सहकारीमंत्री अमित शहांचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अमित शाह गुजरातमधून येतात पण त्यांच महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. त्याच कारण म्हणजे ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. त्यानंतर भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांची री.. ओढली.
फडणवीस म्हणाले, अजित दादा म्हणाले की अमित भाईंचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे, कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत. पण, अमित भाईंचा जन्म मुंबईतील आहे, त्यांची कर्मभूमी जरी गुजरात आणि देश असली तरी, जन्मभूमी महाराष्ट्र आहे. तर, उद्योग व्यवसायात असताना सुरूवातील त्यांनी मुंबईतच स्वत:ची फॅक्टरी त्यांनी सुरू केली होती. त्यामुळे, त्यांची कर्मभूमी देखील काही काळासाठी महाराष्ट्र राहिली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळेच, महाराष्ट्रातून गेलेल्या डेलिगेशन्सला त्यांच्याकडून कायम सकारात्मक प्रतिसाद मिळतो, असेही फडणवीसांनी सांगितले.
अजित पवार काय म्हणाले
देशात सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास आहे. सहकार ग्रामीण भागापासून शहरात पोहोचला आहे. सहकार विभागाचे देशात मोठ योगदान दिलं आहे. देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरू करण्यात आलं आहे. सहकार क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे प्रत्येक गावात पोहोचले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं.