शिरूर: उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा पक्षातील एका बड्या नेत्याला शिरूरची जागा लढवायची होती. मात्र शिरूर लोकसभेचा सर्व्हे समोर आला तेव्हा त्या सर्व्हेमध्ये असे दिसले की खा. डॉ. अमोल कोल्हे ही निवडणूक तीन लाखांनी जिंकू शकतात. त्यामुळे त्यांनी बरीच शोधाशोध करूनही त्यांना कोणीच मिळालं नाही. म्हणून त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुढे केले, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते. त्यामुळे ते ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते, मात्र अजित पवारांना उमेदवार सापडला नसल्याने त्यांनी आढळरावांना याबाबत विचारले असता, त्यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलून निवडणुकीची तयारी सुरू केली असेही ते म्हणाले.
आदिवासी शाळांमधील मुलांना दूध पुरविणाऱ्या सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या मित्राच्या पराग कंपनीला एका लिटरसाठी सुमारे १४० रुपये मिळत होते. ५० रुपये उत्पादन खर्च वजा जाता तब्बल ९० रुपयांचा नफा या कंपनीला मिळत होता. या कंत्राटामधून पराग कंपनीला तब्बल ९० कोटी रुपयांचा फायदा झाला. सरकारकडे एका खाजगी कंपनीला द्यायला ९० कोटी रुपये आहेत, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनुदानासाठी द्यायला ५ कोटी रुपये नाहीत आणि अशा कंपन्या पोसण्यासाठी पक्ष बदलावा वाटला असा आरोप यावेळी आ. रोहित पवारांनी केला.
भाजपकडून ईडीची भीती
भाजपने अनेक नेत्यांना ईडीची भीती दाखवून पक्षात घेतले, नेत्यांनीही तुरुंगापेक्षा भाजप बरा असे म्हणत पक्ष प्रवेश केला. भाजपने महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्ष फोडण्यासाठी अनाजी पंताची नीती वापरली, हे आता सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार भाजपच्या या अनाजी पंताच्या वृत्तीला तुडवल्याशिवाय राहणार नसल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.
भरमसाठ लुटमार करून तुटपुंजी मदत
आज शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही. शेतीशी संबंधित अनेक गोष्टींवर जीएसटी लावला जातो. एका हाताने भरमसाठ लुटमार करून दुसऱ्या हाताने शेतकरी सन्मान योजनेच्या गोंडस नावाखाली अतिशय तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देऊन त्यांना भुलविण्याचा प्रयत्न केला जातो असेही पवार म्हणाले.