पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळे याची न्यायालयानेन्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान काळे याने सीबीआय कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार शुक्रवारी न्यायालयात केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजय ढाकणे यांनी काळे याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. काळेला सीबीआयच्या पोलीस कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीने एसआयटीने मारहाण केली. तसेच सीबीआयच्या कोठडीत असताना इतर यंत्रणांनी त्याच्याकडे तपास केला. सीबीआयकडून या तपासासाठी परवानगी आली होती, असे बचाव पक्षाचे वकील अॅड. धर्मराज चंडेल यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान न्यायालयाने काळे याकडे पोलिसांबाबत काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. आपल्याला पायावर आणि पाठीवर पोलिसांनी मारले असल्याचे त्याने सांगितले. मात्र शुक्रवारी दिवसभरात कोणताही त्रास देण्यात आला नाही, असेही त्याने स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने काळेला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणात अटक असलेला आरोपी राजेश बंगेराला सीबीआय कोठडीत कोल्हापूर एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार यापूर्वी न्यायालयात केली होती. याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, राजेश बंगेरा, अमित दिगवेकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर शरद कालसकरच्या पोलीस कोठडी १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी काळेचा सीबीआयच्या पथकाने बेंगळुरू येथील तुरुंगातून ताबा घेतला होता. तो डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतही मास्टरमाईंड असावा, असा सीबीआयच्या अधिका-यांना संशय आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयित मारेकरी शरद कळसकर आणि अंदुरे यांनी ज्या दुचाकीवरून पळ काढला तिची व्यवस्था काळेने केली होती, अशी माहिती उघड झाली होते. त्यामुळे त्याला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. काळेला ६ सप्टेंबरला दुपारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले आहे होते. त्यावेळी त्याला १४ सप्टेंबरपर्यत कोठडी देण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी मंजून झाल्याने काळे याला लंकेश हत्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
अमोल काळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी : कोठडीत मारहाण झाल्याची केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 9:53 PM
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळे याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
ठळक मुद्देकाळेला बंगळुरू पोलिसांच्या हवाली करणारसीबीआय कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार