- प्रकाश गायकर
पिंपरी : ‘शिरूरच्या खासदारांनी लक्ष न दिल्याने मतदारसंघ दुर्लक्षित राहिला. मात्र, आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देऊन निवडून आणणार,’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि.२५) केले. त्यानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे खासदार डॉ. कोल्हे यांच्या विरोधात महायुती कोणत्या तगड्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जवळपास निश्चित झाली असून ते तयारीला लागले आहेत. दुसरीकडे महायुतीतील अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. सोमवारी अजित पवार यांनी खासदार कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांना निवडून आणण्यासाठी दिलीप वळसे-पाटील आणि आपण जिवाचे रान केले. आता आम्ही तिथे दिलेला उमेदवार निवडून आणणार, असा दावा पवार यांनी केला. त्यामुळे हा आपल्यासाठी हिरवा कंदील असल्याचे मानत महायुतीतील इच्छुकांनी दंड थोपटले आहेत.
खासदार कोल्हेंच्या विरोधात २०१९ ला माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी निवडणूक लढवली होती. आता ते शिंदे गटात आहेत. दरम्यान, ते अजित पवार गटात येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. जागा वाटपामध्ये ही जागा पवार गटाला सुटल्यास आढळराव त्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेलाही हवा देण्यात आली होती.
दुसरीकडे महायुतीतून सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. वळसे पाटील नऊ वर्षे शरद पवार यांचे खासगी सचिव होते. अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळेच महायुतीतून वळसे-पाटील यांना रिंगणात उतरवले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या विधानानंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. लांडे यांनी अनेकदा लोकसभा लढवण्याची इच्छा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. २००९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत लांडे शिरूरमधून लढले होते. त्यावेळी आढळराव-पाटलांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्येही लोकसभा लढण्यासाठी त्यांनी तयारी केली होती. मात्र, पक्षाने कोल्हे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे लांडे यांचे गणित बिघडले. मात्र, आता लोकसभेसाठी त्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.