अमोल कोल्हे यांनी गुन्हा लपवला, वंचितचा आरोप; उच्च न्यायालयात दाद मागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:58 AM2024-04-27T11:58:23+5:302024-04-27T11:59:50+5:30
कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर शुक्रवारी (दि. २६) आक्षेप घेण्यात आला. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती नोंदविलेली नाही....
पुणे : शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याचा उल्लेख नसल्यावरून त्यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अफताब अन्वर शेख यांनी केली होती. मात्र, नावाचा उल्लेख अमोल कोल्हे असला तरी ते उमेदवार असल्याचे स्पष्ट होत नाही, असे सांगून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी ही तक्रार फेटाळून लावली. तसेच त्यांचा अर्जही वैध ठरविला. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर शुक्रवारी (दि. २६) आक्षेप घेण्यात आला. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती नोंदविलेली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली. तक्रार अर्जात उमेदवार अमोल रामसिंग कोल्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे नमूद असून, त्यासोबत जोडलेल्या नोटीसमध्ये केवळ अमोल कोल्हे नावाचा उल्लेख आहे. त्यामध्ये त्यांचा पत्ता नमूद नाही. त्यामुळे संबंधित व्यक्ती ही शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे हेच आहेत, हे स्पष्ट होत नाही, असे सांगून मोरे यांनी ही तक्रार निकाली काढली आणि कोल्हे यांचा अर्ज वैध ठरविला.
याबाबत शेख म्हणाले, कोल्हे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी कोल्हे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख होते. या गुन्ह्यात तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार विनायक निम्हण आणि महादेव बाबर यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला. आढळराव पाटील यांनी या गुन्ह्याचा त्यांच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. मात्र, कोल्हे यांनी उल्लेख केलेला नाही. ही गंभीर स्वरूपाची बाब असूनही त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
गुन्ह्याची कोणतीही कल्पना नव्हती. पोलिसांकडून नोटीसही देण्यात आली नव्हती. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नाही. २०१६ मध्ये पुण्यातील असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला विरोध केला होता. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता.
- डॉ. अमोल कोल्हे, शिरूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार