मी रडीचा डाव खेळत नाही, तुम्हाला मैदानावरच पराभूत करणार- आढळराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:00 PM2024-04-27T18:00:13+5:302024-04-27T18:04:58+5:30
तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असल्यामुळे तुमच्या स्वप्नातदेखील आढळराव यायला लागले आहेत....
उदापूर (पुणे) : खासदारकीची निवडणूक देशाची असून तुमच्या आमच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची निवडणूक आहे. पण, आज दिल्लीच्या वार्ता करणाऱ्यांनी ही निवडणूक गल्लीत आणून ठेवली आहे. समोरच्या उमेदवारावर कोणीतरी आक्षेप घेतला हे मला माहीतदेखील नाही परंतु, तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असल्यामुळे तुमच्या स्वप्नातदेखील आढळराव यायला लागले आहेत. मी कधीही रडीचा डाव खेळत नाही आणि तुमचा अर्ज बाद करून मी लढणार तरी कुणाशी, तुम्हाला आम्ही मैदानावरच पराभूत करणार असा टोला महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी खा. डॉ. अमोल कोल्हे यांना लगावला.
पिंपळगाव जोगा- डिंगोरे गटातील पिंपळगाव सिद्धनाथ, मढ, पिंपळगाव जोगा, डिंगोरे, ओतूर, उदापूर येथील प्रचार सभेदरम्यान आढळराव-पाटील बोलत होते. यावेळी आ. अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके, संतोष नाना खैरे, गणपतराव फुलवडे, बबन तांबे, प्रियंका शेळके, विकास राऊत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, विरोधकांना आतापर्यंत शेतकरी आठवले नाहीत. कांद्याचे भाव पडलेले आठवले नाही, पाच वर्षांत गावागावांत कुठेही फिरकले नाही, दुसऱ्या बाजूला पराभव झाला तरी जनता दरबार चालूच ठेवला. पुन्हा नव्या उमेदीने जनतेत मिसळलो आहे. काम करणारा खासदार निवडून द्या. गायब असलेला खासदार नको असेदेखील ते म्हणाले.
डॉ. अमोल कोल्हे राजकारणात तात्पुरते आले होते. राजकारण हा त्यांचा पिंड नाही. माणूस सरळ आहे पण, कामाचा नाही "जो कामाचा नाही, तो रामाचा नाही" पाच वर्षांत कुणालाही भेटले नाही, जनसंपर्क ठेवला नाही, आमचा उमेदवार पळपुटा निघाल्यामुळे आम्ही आढळरावांना विनंती करून पक्षात बोलावून घेतले आहे. कोल्हे खोटं बोलतात की, छगन भुजबळ साहेबांना उमेदवारी देणार होते ते जर शिरूर लोकसभेत उमेदवारी अर्ज भरून उभे राहिले असते तर, तुम्ही उभे राहिले नसते, अशी खरमरीत टीका गणपतराव फुलवडे यांनी उदापूर येथील प्रचार सभेत केली.