पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूर लोकसभा मतदार संघातील दाैऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी थेट उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकांराना उभे करतो. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे त्यापैकी एक असून, त्यांचा राजकारणाचा पिंड नाही, अशी टीका केली. तर त्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकाही सेलिब्रिटी खासदाराला ‘संसदरत्न पुरस्कार’ मिळाल्याचे ऐकिवात नसल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. त्यामुळे होळीपूर्वीच आता पवार-कोल्हेंमध्ये शब्दांची धुळवड रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बारामतीनंतर शिरूर लोकसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट झाले असले, तरी अद्यापही त्यांना उमेदवार मिळालेला नाही. दुसरीकडे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव-पाटील हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणली आहेत. विशेष म्हणजे आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादीतून उमेदवार होण्याची इच्छादेखील व्यक्त केली. मात्र, त्याला अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी विरोध दर्शवला. एकूणच विद्यमान खासदारांविरोधात उमेदवार कोण असणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नावाचीही चर्चा झाली. पण ते खासदार कोल्हे यांना टक्कर देऊ शकत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील मांडवगण फराटा आणि मंचर येथे सभा तसेच गाठीभेट घेऊन आढावा घेतला. मंचरची सभा सोडली तर आंबेगाव तालुक्यात स्वागत करण्यापासून ते दुपारचे जेवणापर्यंत अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे एकत्र असल्याचे समोर आले आहे.
अमोल कोल्हेंचा राजकारणाचा पिंड नाही : पवार
मी जरी कडू बोलत असलो तरी शब्दाचा पक्का आहे. मागच्या वेळी मीच अमोल कोल्हे यांच्यासाठी मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. त्यांचे वक्तृत्व चांगले होते. दिसायला राजबिंडा आहे. त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं. दोन वर्षांनंतर डॉ. अमोल कोल्हे हे माझ्याकडे येऊन राजीनामा द्यायचा आहे. व्यावसायिक नुकसान झाले. रोज वेळ द्यावा लागतो, असे म्हणत होते.
शेवटी ते कलावंत आहेत. त्यांचा राजकारण हा पिंड नाही. आजही ते नीलेश लंके यांच्या मतदारसंघात नाटकाचे प्रयोग करण्यात व्यस्त आहेत. देशात गोविंदा, हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन असे अनेक सिनेकलावंत राजकारणात आले. मात्र, ते राजकारणात फार काळ टिकले नाहीत. नुकसान सर्वसामान्य माणसाचे झाले. लोकसभा निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील, आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ताही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करत आहेत. ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे. पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचाही विचार करा.
एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न मिळाला नाही : कोल्हे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘अजित पवार मला सेलिब्रिटी उमेदवार म्हणून हिणवत आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, धर्मेंद्र या कलाकारांची उदाहरणं दिली. परंतु, त्यांनी ज्यांची उदाहरण दिली, त्यातल्या एकाही सेलिब्रिटी खासदाराला ‘संसदरत्न पुरस्कार’ मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. माझ्या मतदार संघातील लोकांचे प्रश्न मांडताना मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.’
अजित पवार सातत्याने दावा करत आहेत की, मी त्यांना राजीनामा देण्याबद्दल बोललो होतो. परंतु, मला त्यांना विचारायचं आहे की, त्या काळात मी संसदेत अनुपस्थित राहिलो का? माझ्या मतदार संघातील प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की, तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षा माझी कामगिरी कायमच उजवी राहिली आहे. हवं तर रेकॉर्ड तपासून पहा.
राजकारणात खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल तर आपण १०-१० वेळा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय? लपूनछपून भेटीगाठी करण्याचं कारण काय? मला शरद पवारांनी संधी दिली आहे. त्याला प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. शिरूर मतदार संघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कटिबद्ध राहीन, असेही कोल्हे म्हणाले.