हडपसरमधील कोयता गँगवर कारवाईबाबत खासदारांची गृहमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 10:05 AM2022-12-16T10:05:54+5:302022-12-16T10:10:07+5:30
हडपसर पोलिस स्टेशनचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही...
हडपसर : मांजरी बुद्रुक व हडपसर परिसरातील ‘कोयता गँग’ची दहशत मोडून काढण्यासाठी तातडीने कारवाई करण्याबाबत खुद्द शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करावी लागली आहे. शहराच्या उपनगरातील मांजरी बुद्रुक, हडपसर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक हडपसर पोलिस स्टेशनचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही.
मांजरी बुद्रुक येथे दहशतीच्या बळावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न ‘कोयता गँग’ने चालवला असून अनेक अल्पवयीन मुलं या गँगमध्ये सामील आहेत. हवेत कोयते फिरवत दहशत निर्माण करीत रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे दागिने लुटणे, ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणे आदी प्रकार सातत्याने होत आहेत. या घटनांविरोधात तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या घरावर दगडफेक करण्यात येते.
या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. परंतु पोलिसांकडून अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या कोयता गँगला पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सोमवारी (दि.१२) मांजरी बुद्रुक व हडपसर येथील नागरिकांनी हडपसर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. तरी आपण जातीने लक्ष घालून मांजरी बुद्रुकसह हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुंडगिरी संपविण्यासाठी कोयता गँगवर आणि अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करावी. तसेच या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी कोल्हे यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.