Amol Kolhe | "शिवनेरीवर भगवा फडकलाच पाहिजे..." खासदार अमोल कोल्हेंचा CM शिंदेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:20 PM2023-02-20T14:20:26+5:302023-02-20T14:31:06+5:30
डॉ. अमोल कोल्हे यांचा शासकीय शिवजयंती कार्यक्रमावर बहिष्कार...
जुन्नर (पुणे) : किल्ले शिवनेरी कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा या मागणीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा शासकीय शिवजयंती कार्यक्रमावर बहिष्कार टाकला खरा, मात्र त्यांच्या बहिष्काराची कुठेच दखल घेतली गेली नाही. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे शासकीय कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. मात्र, शासकीय कार्यक्रम संपल्यावर ते हातात भगवा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांसमवेत गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक झाले.
शिवजन्मस्थळ शिवनेरीवर १०० फूट उंच भगवा ध्वज लावावा, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे करीत होते. ही मागणी पूर्ण झाली नाही तर शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका खा. अमोल कोल्हे यांनी घेतली होती. परंतु, प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने खासदार कोल्हे कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. मात्र, शासकीय कार्यक्रम संपल्यावर ते हातात भगवा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांसमवेत गडावर आले.
खासदार अमोल कोल्हे यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये," भगवा जाणीव आंदोलनात खांद्यावर स्वराज्याचा भगवा ध्वज घेऊन आपण सारे मनापासून सहभागी झालात! किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज डौलाने फडकलाच पाहिजे या भावनेतून आपण एकजुटीने केलेल्या या जाणीव आंदोलनास येत्या काळात यश मिळेलच! तमाम शिव-शंभू भक्तांच्या वतीने 1 वर्षाचा अल्टीमेटम आपण सरकारला दिला आहे, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन आपण हाती घेऊया!
आपण सर्वजण आलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो! आपण सर्वजण सुखरूप घरी जावे ही नम्र विनंती! येत्या काळातही हा लढा असाच तीव्र होत राहील, असे आपणांस आश्वस्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार!"