"तुम्ही जे दार ठोठावत आहात त्याची किल्ली माझ्याकडे..." आढळराव पाटील राष्ट्रवादीत जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:11 AM2023-07-07T10:11:38+5:302023-07-07T10:27:55+5:30
माझ्या अभिनयाविषयी कुचेष्टा केली, तर होय, अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन आहे...
पुणे : "जबाब मिलेगा, करारा जबाब!" असं, म्हणत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. मी तुमच्या वयाचा आदर ठेवतोय, चार वेळा तुम्हाला उद्धव ठाकरेंनी लोकसभेचे तिकिट दिले, तरी त्यांच्या अडचणीच्या काळात स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांची साथ सोडून निघून गेलात. दुसरीकडे २०१९ ला मला एकदाच शरद पवारांनी तिकिट दिले आणि आज अडचणीच्या काळात मी ठामपणे त्यांच्यासोबत उभा आहे, हा आपल्या दोघांमधला मुलभूत फरक आहे, असं खासदार कोल्हे म्हणाले. त्यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करून ही टीका केली.
पुढे बोलताना खा. कोल्हे म्हणाले, माझ्या अभिनयाविषयी कुचेष्टा केली, तर होय, अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन आहे आणि जनतेला ठाऊक आहे माझी अमेरिकेत कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल अस करणं योग्य नाही. आपल्यासारख्या वयस्कर नेत्याने या राजकीय घडामोडींचा निषेध करणे अपेक्षित होते. परंतु, ज्या घटनांमध्ये आपणाला संधीसाधूपणा दिसतो, त्याचे वाईट वाटले. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मी तुमचा प्रचार केला होता याचेही वाईट वाटले.
आढळरावांचे शरद पवारांच्या भेटीसाठी प्रयत्न?
माध्यमांसमोर एक बोलायचे आणि दुसरीकडे शरद पवार यांना भेटण्यासाठी आडूनआडून जी दारे ठोठवत आहात त्या दाराची किल्ली तर माझ्याकडेच आहे. आपल्या वयाचा मान ठेऊन मी आपलं स्वागत करीनच पण राजकारणातला सुसंस्कृतपणा जपला जावा, एवढीच अपेक्षा, अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर केली.