मुख्यमंत्र्यांवर बोलण्याइतकी अमोल कोल्हेंची उंची आहे का? आढळराव पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 05:42 PM2021-07-18T17:42:39+5:302021-07-18T18:02:52+5:30
खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना - राष्ट्रवादीत रंगला कलगीतुरा
मंचर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठराविक नेत्यांमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते व एक-दोन जण वगळता इतर कोणीही बिघाडी करत नाही. बाह्यवळण रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा साधा फोटो नाही, रस्ता मी मंजूर केला मात्र मला साधा फोन आलेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलणे इतपत खासदार कोल्हे यांची उंची आहे का असा टोला शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला.
खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना - राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. आढळराव पाटील यांनी आदल्या दिवशी उद्घाटन उरकून घेतले. तर दुसऱ्या दिवशी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी उद्घाटनप्रसंगी आढळराव पाटील यांना यांच्यावर खरमरीत टीका केली. तसेच शरद पवार यांच्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले आहे असे वक्तव्य केले होते.
त्याला उत्तर देताना आढळराव पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावरील या पाच बायपास रस्त्याची मंजुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगून मी मिळवली आहे.तशी कागदपत्रे माझ्याकडे आहे.मात्र या रस्त्याचे उद्घाटन करताना जाहिरातीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा साधा फोटो वापरला गेला नाही. मी हा रस्ता मंजूर करून सुद्धा मला साधा फोन केला नाही. आघाडीत बिघाडी तुम्ही केली आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
खासदार कोल्हे, आमदार मोहिते व इतर १ ते २ वगळता आघाडीत कोणीही बिघाडी करत नाही. हे रस्ते माझ्या प्रयत्नातून मंजूर झाल्याने उद्घाटन करण्याचा अधिकार आम्हाला आहे. मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची त्यांची उंची आहे का असा सवाल करून ते म्हणाले खासदार कोल्हे हे सध्या हवेत गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठे केले आहे. प्रकाशझोतात आणले हे तुम्ही विसरलात. मी म्हातारा झाल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अशी टीका करणार का, असा सवालही उपस्थित केला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संगनमताने राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असून आमचा आघाडीला विरोध नाही. मात्र ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.