पुणे : बैलगाडा मालकांच्या आयुष्यातील महत्वाचा घटक म्हणजेच बैलगाडा शर्यत होय. अनेक दिवसानी यावरील बंदी उठली आणि शर्यतीला परवानगी मिळाली. त्यामुळे सर्वत्र ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नानोली येथे बैलगाडा घाटातला एका जिगरबाज व्यक्तीने घोडीवर बसून दोन्ही हातवर करून आनंद व्यक्त करतानाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. मधुकर नाना पाचपुते असे या ७५ वर्षीय आजोबांचे धाडस पाहून तरुणांनाही लाज वाटू लागेल. नानांचे सर्व स्तरावरून कौतुकही झालेले होते. या मधुकर नानांची अमोल कोल्हे यांनी आज भेट घेतली.
त्यावेळी बारीचा विशेष सन्मान व्हावा म्हणून कोल्हे यांनी स्वतःचा फेटा त्यांना बांधला व आशीर्वाद घेतले. यावेळी ते वडीलकीच्या नात्याने मधुकर नाना आग्रहाने म्हणाले की.. 'मला एक फोटो पाहिजे!' खरं सांगायचं म्हटलं तर ७५ वर्षांच्या या जिगरबाज व्यक्तिमत्वासोबत फोटो काढण्याचा मोह मलाही आवरला नसल्याचे कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
कालच आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारत अमोल कोल्हे यांनी घडी धरली होती. त्यांच्या या धाडसीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांकडून कोल्हे यांचे कौतुकही करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हे यांचीही नानांना भेटण्याची इच्छा होती. आज सकाळी त्यांना भेटल्यावर कोल्हे यांनी स्वतःचा फेटा त्यांना बांधला व आशीर्वाद घेतले. व त्यांच्यासोबत एक फोटो काढला.
मधुकर पाचपुते यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचोशी आहे. पाचपुते आजोबांना बैलगाड्याचा शौक अनेक दिवसांपासून आहे. बैलगाडा सुरू झाल्याने आजोबांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
अमोल कोल्हे यांनी आव्हान स्वीकारत धरली होती घोडी
बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना म्हणाले होते. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो,” असे अमोल कोल्हे यांनी सांगितले होते. आज अखेर अमोल कोल्हे यांनी दिलेल्या शब्दला सत्यात उतरवले आहे. पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बैलगाडा शर्यतीला अतिशय उत्साही वातावरणात सुरुवात झाली. गावातील असंख्य नागरिकांनी शर्यत बघण्यासाठी गर्दी केली होती. या शर्यतीत अमोल कोल्हे यांनी तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो असे सत्यात उतरवून दाखवले आहे.