पुणे : बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना म्हणाले होते. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो,” असे अमोल कोल्हे यांनी सांगितले होते. हा दिलेला शब्द अमोल कोल्हे आज सत्यात उतरवणार आहे.
पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे घोडीवर बसणार आहेत. निमगाव दावडीचे बैलगाडा मालक आजच्या दिवशी या मानाच्या घाटात स्वखुशीने आपापल्या बैलांची जोडी उतरवत असतात. तिथेच आज खासदार अमोल कोल्हे घोडीवर बसून, बैलजोडी समोर बारी मारणार आहेत. डिसेंबर २०२१च्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने विविध अटी व शर्ती घालत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत आढळराव आणि कोल्हे यांच्यात द्वंद्व सुरु असते. या पार्श्वभुमीवर आढळराव यांनी कोल्हे यांना उपरोधिक आवतन दिले होते.
लोकसभेच्या निवडणुक प्रचारादरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते. कोल्हेंच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढाळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. 'खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे त्यांनी म्हटलं. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळरावांनी कोल्हेंना निमंत्रण धाडलं अखेर आढळराव पाटलांचे आव्हान कोल्हेंनी स्वीकारले आहे.