पिंपरी : एचए मैदानावर सुरू असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या वेळी फुकट पास न दिल्यास महानाट्याचे प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी पोलिस कर्मचाऱ्याने दिली होती. याबाबत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी महानाट्यावेळी जाहीरपणे सांगितले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत, संबंधित पोलिस नाईक महेश नाळे यांना निलंबित करण्यात आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले.
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग गुरुवारी (दि.११) पासून सुरू आहेत. मात्र, पिंपरी चिंचवडच्या पोलिस दलातील एका पोलिसाने फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे डॉ.कोल्हे यांनी जाहिररीत्या सांगितले, तसेच धमकी देणाऱ्या पोलिसांना कडक समज द्यावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना धमकी दिल्याचे समजताच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच खासदारांना पोलिस अशी वागणूक देत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित करीत राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, असे म्हटले.