नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघातील जनतेनं खासदार केलं. त्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हे यांनी लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत पाऊल ठेवलं आहे. संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला आहे. तसेच शिवराज्याभिषेकदिनी संसदेत आपलं पाऊल पडल्याचेही कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन म्हटले आहे.
अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात कोल्हे यांनी शिवसेनेच्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केले आहे. कोल्हे यांना 635830 तर पाटील यांना 577347 मतं मिळाली आहेत. त्यामुळे कोल्हे यांचा 58483 मतांनी विजय झाला आहे. विजयानंतर प्रथमच आणि खासदार बनल्यानंतरही आज प्रथमच त्यांनी दिल्लीत संसदभवनात पाऊल ठेवलं. संसेदत पोहोचल्याचा मनस्वी आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. ''छत्रपतींच्या मावळ्याचं "संसदेत"आज पहिलं पाऊल आणि मुहूर्त "शिवराज्याभिषेक दिनाचा"! अभिमान, कृतज्ञता आणि जबाबदारी!!!, असे म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याचा फोटोही शेअर केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी 2014 च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रिक केली होती. यावेळी ते चौकार मारण्याच्या तयारीत होते. परंतु, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हेंच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगला व सक्षम उमेदवार सापडला आणि त्यांनी पाटील यांची अलगद विकेट काढली. शिरुर मतदारसंघात कोल्हेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सलग तीन निवडणुकांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडित झाली. आढळराव पाटील यांना प्रस्थापितांविरोधी मतदानाचा फटका बसला त्याचबरोबर वरील सर्व प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवून केवळ आश्वासनांची खैरात केल्यामुळे मतदारराजाने त्यांच्याबाबत असलेली नाराजी मतदान यंत्रातून प्रकट केली व भरभरून आपल्या मतांचे दान डॉ. अमोल कोल्हे यांच्या झोळीत टाकले. कोल्हे निवडून आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या भावना वाढल्या आहेत. ते येत्या पाच वर्षांत यातून मार्ग काढतील, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.