विलास शेटे
मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपशी जवळीकता साधली असतानाच आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आढळराव आता लवकर घड्याळ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. भाजपने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा दौरा झाला. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रहलाद सिंह पटेल यांनी मतदारसंघातून बैठका घेतल्या. भाजपला कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काबीज करायचा आहे. त्या दृष्टीने भाजपने तयारी केली आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर सलग तीन वेळा येथून पूर्वीचा खेड व नंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चढत्या मताधिक्याने विजय मिळविला होता. २०१९ ला राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना पराभूत करून मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित केले. पराभव होऊनही आढळराव पाटील मतदार संघात सक्रिय राहिले. मात्र खासदार कोल्हे यांचा जनसंपर्क कुठेच दिसून येत नाही. त्यात कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट चर्चेला वाव देऊन गेली. कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असून त्यांची भाजपशी जवळीक वाढत गेल्याचे समोर आले.
खासदार कोल्हे यांनी अद्याप स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी समाजमाध्यमातून तीव्र निषेध नोंदवला होता. याव्यतिरिक्त कोल्हे यांनी अद्याप भाष्य केलेले नाही. भाजपने अंतर्गत सर्व्हे केला असून त्यात कोल्हे यांना पसंती दिली जात गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत खासदार कोल्हे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. मग आढळराव पाटील यांचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित झाला.
राजकारणात मुरब्बी असलेले आढळराव पाटील यांचा प्लॅन बी तयार असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. राज्यात राजकीय घडामोडी घडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भगदाड पाडून भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांना साथ देणारे आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शिरूरची जागा राष्ट्रवादीला जाणार असल्याने ठाकरे यांनी आढळराव पाटील यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्यास सांगितले. त्यामुळे ते शिंदे गटात सामील झाले. भाजप व शिंदे गटाकडून शिरूर मतदारसंघात आढळराव पाटील यांनाच उमेदवारी मिळेल असे वाटत होते. खासदार अमोल कोल्हे यांची भाजपशी वाढत असलेली जवळीक पाहता आढळराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल झाली.
आढळराव-पाटील यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. त्यांना आता घड्याळाची टिकटिक आवडू लागली आहे. गावडेवाडी येथील एका कार्यक्रमात माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व आढळराव पाटील यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. दोघे हास्यविनोदात रमले होते. चांडोली येथील जवान सुधीर थोरात हे कर्तव्यावर असताना शहीद झाले. त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात माजी सभापती देवदत्त निकम यांनी वळसे-पाटील यांच्याबरोबर आढळराव पाटील यांच्याही वतीने श्रद्धांजली अर्पण केली. इतकेच नाही तर राष्ट्रवादीवर धडाडणारी तोफ आता गारद झाल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे नव्या समीकरणांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आढळराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. लोकसभेसाठी उमेदवारीचा शब्द त्यांना देण्यात आला आहे. मात्र यदाकदाचित काही दगाफटका झालाच तर राष्ट्रवादीचे उमेदवार आढळराव पाटील असू शकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. आढळराव पाटील खासदार नसताना चांगली कामगिरी करताहेत. ते सहज उपलब्ध होतात. त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क आहे. यदाकदाचित आढळराव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार झालेच तर महाविकास आघाडी असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला साहजिकच आढळराव पाटील यांचे काम करावे लागेल. त्यामुळे जुने सहकारी पुन्हा त्यांना साथ देतील, असेही जाणकार सांगतात.
आढळराव पाटील सध्या तरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून, शिंदे गटात राहून प्रामाणिकपणे काम करत आहेत. मतदार संघातील विकासकामांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही; तर दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक मौन बाळगले आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी समीकरणे बदलत जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आढळराव पाटील हे कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवतील, असा दावा केला. त्यामुळे नक्की काय होणार याची मतदारांना उत्सुकता आहे.