लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या गंभीर रुग्णांपैकी ९५ ते ९८ टक्के रुग्ण बरे होऊन जात आहेत ही आशादायी बाब आहे. होय, आम्ही रुग्णांसाठी आहोतच, पण सामान्य नागरिकांची देखील काही जबाबदारी आहे.
कोरोनाबाबत लोकांमध्ये अकारण भीतीचे वातावरण आहे. लोक आपणहून सीटीस्कॅन करून घेतात आणि घाबरून बेड शोधायला लागतात. साधा बेड किंवा ऑक्सिजन बेडने काम झालेले असते. पण आयसीयूची मागणी करतात. काही वेळा व्हायरलमध्ये अँटिबायोटिकची औषधे घेतात. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपणहून डॉक्टर होऊ नका आणि स्वत:च तुम्हाला बेडची गरज आहे, हे ठरवू नका, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना लक्ष वेधले आहे.
---
* कोरोनाचे लवकरात लवकर निदान होणे, उपचार करणे, मानसिक स्थिर राहाणे आणि प्रोटीन व व्हिटॅमिनयुक्त आहार असेल तर रुग्ण लवकरात लवकर कोरोनातून बाहेर पडू शकतो.
* मला काहीच होणार नाही या आविभार्वात राहू नका. ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी असेल तर लगेच कोरोनाची चाचणी करा. जर निगेटिव्ह असेल तर यातून बाहेर पडता, पण टेस्ट पॉझिटिव्ह आली तर लवकरात लवकर उपचार केले तर शरीरात दाह किंवा फुफ्फुस, किडनी, हदय यावर परिणाम होणार नाही.
* विषाणूचे वाढणे पहिल्या दहा दिवसात असते. या दिवसाच्या आत निदान होऊन आलात तर उपचारपद्धतीला यश मिळते. ऑक्सिजन वर जाणारे रुग्ण परत येऊ शकतात.
* कोरोनाची टेस्ट सोडून लोक सिटी स्कॅनच्या मागे लागतात. पहिल्या दिवशी
स्कोअर शून्यच असतो. त्यामुळे मला कोरोना नाही असे वाटते आणि कोरोनाची टेस्ट करीत नाहीत. कोविड आणि कोविड मार्करची टेस्ट केली तर उपचारपद्धती ठरवता येते. कोविडमधली एक गुंतागुंत असलेल्या न्यूमोनियासाठी सिटीस्कॅन आहे. कोरोनाचे निदान करायला सिटीस्कॅन नाही.
* कोरोना न्यूमोनिया असेल तरच ऑक्सिजन पातळी खाली येणार आहे. कोविड व्हायरेमियाचे जर निदान झाले तर न्यूमोनियापर्यंत जाणार नाही.
* आरटीपीसीआरचे निदान करण्याची क्षमता ६० ते ६७ टक्के आहे. एकदा पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखविला तर पुढच्या १७ दिवसांसाठी तो पॉझिटिव्हच असतो. यात दुमत नाही. एका लॅबमध्ये पॉझिटिव्ह आलात तर दुसऱ्या लॅबमध्ये जाऊ नका. रिपोर्ट हा पॉझिटिव्हच असणार आहे. त्यातून फैलावाची शक्यता अधिक असते.
- डॉ. केतन क्षीरसागर, ऑइस्टर अँड पर्ल हॉस्पिटल
--
* कोरोनामुळे फुफ्फुसात संसर्ग होतो आणि श्वास घेण्याची व ऑक्सिजनची क्षमता कमी होते. ऑक्सिजन रक्तापर्यंत पोहोचत नाही. मग रुग्णाला ऑक्सिजन दिल्यानंतर पाच ते सहा दिवसांत रुग्ण बरा होतो. ऑक्सिजनच्या कमरतेची पूर्तता करणे हा उपचार पद्धतीचा महत्त्वाचा भाग आहे.
* रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या गंभीर रुग्णांपैकी ९५ ते ९८ टक्के रुग्ण बरे होऊन जातात.
* सध्या रुग्णालयांना देखील मोठ्या अडचणींंचा सामना करावा लागतोय. ऑक्सिजनची खूप कमतरता आहे. आम्हाला ५ ते ६ पट दराने ऑक्सिजन काळ्या बाजारातून खरेदी करावा लागतो. रेमडेसिविर औषधाचा देखील तुटवडा आहे. तरी आम्ही या सर्व अडचणींवर मात करून योग्य वैद्यकीय सेवा देणे सुरू ठेवले आहे.
- डॉ. अनंत बागुल, युनिव्हर्सल हॉस्पिटल
----
* कोरोनाबाधित रुग्णाला लवकरात लवकर उपचारासाठी दाखल करून घेणे. सुरुवातीच्या काळातच तातडीने ऑक्सिजन सुरू करणे, रक्त पातळ करण्याची औषधे देणे आणि रेमडेसिविरचे इंजेक्शन देणे यामुळे रूग्णांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *सुरूवातीपासून रूग्णांना योग्य उपचार दिले गेल्यास पुढची गंभीर स्थिती टाळता येते. या गोष्टी सातत्याने केल्या जात असल्यामुळे रूग्णांना सुखरूप घरी पाठवणे शक्य होत आहे.
* सध्या रूग्णालय, डॉक्टर्स, परिचारिका यांसह वैद्यकीय क्षेत्राशी निगडित प्रत्येक घटकांवर ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी सामान्य नागरिकांनी देखील जबाबदारीचे भान राखावे. मास्क, सॅनिटायझेशन आणि फिजीकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. घरातल्या घरात सुद्धा वाढदिवस किंवा इतर समारंभ शक्यतो टाळावेत.
*रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांची अपेक्षा असते की रुग्णालयात आल्यावर १०० टक्के रिझल्ट मिळावेत. पण प्रत्येकवेळी तसे होईलच असे नाही. मात्र रुग्णाचे नातेवाईक हायपर होतात, ऐकत नाहीत. मारहाण करतात. मग डॉक्टर्स बेड उपलब्ध होत नाहीत म्हणतात. यामध्ये रुग्णांचेच नुकसान आहे.
- डॉ. विजय नटराजन, सिंबायोसिस हॉस्पिटल