लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील सर्वात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या भेडसावणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे़ ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपूलाच्या कामासाठी १३५ कोटी रूपयांची तरतूद करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़
महापालिकेच्या अर्थसंकल्पात सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी नियोजित विकास कामात असलेल्या या उड्डाणपूलाला स्थायी समितीने निधीची तरतूद उपलब्ध करून दिल्याने, लवकरच या उड्डाणपूलाचे काम सुरू होईल अशी आशा निर्माण झाली आहे़
सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी सोडवण्यासाठी वरदायी ठरणारा हा उड्डाणपूल २ हजार १२० मिटर लांबीचा म्हणजेच दोन किलोमिटर अंतराच्या पेक्षा जास्त अंतराचा राहणार आहे़ हा दोन पदरी उड्डाणपुल बांधण्यास पावसाळ्याचा कालावधी सोडून सुमारे ३ वर्षे कालावधी लागणार आहे़
पुल उभारणी करताना यामध्ये चार पर्याय आहेत़ जेणे करून भविष्यात उभारण्यात येणाऱ्या मेट्रोला याा पूलाचा अडसर ठरणार नाही व मेट्रोचे काम करतानाही कुठलीही तोडफोड करावी लागणार नाही, असे नियोजन केले आहे़ यात राजाराम पूल ते कात्रज बायपास दरम्यान सिंहगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन पदरी एकेरी वाहतुकीसाठी व एकेरी वाहतुकीसाठी फन टाईन थिएटर ते इनामदार चौक असा मार्ग आखण्यात आला आहे़ तसेच राजाराम पूल चौकात स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन पदरी उड्डाणपूल व इंडियन ह्यूम पाईप ते इनामदार चौक दरम्यानच्या उड्डाणपूलाचे नियोजन करण्यात आले आहे़
---------
या दिवाळीपूर्वी या उड्डाण पूलाची निविदा प्रक्रिया राबविली जाईल व पुढील कामकाज होऊन प्रत्यक्षात उड्डाणपूलाच्या कामाला सुरूवात होईल अशी आशा आहे़
---------------------------