पुणे: वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सोमवारपासून (२८ ऑगस्ट) वाहनचालकांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी थकीत दंड तडजोडीने कमी करण्यासाठी १०० वाहनचालकांनी उपस्थिती लावत आपल्या वाहनावरील थकीत दंड कमी करून घेतला. येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात मदत केंद्र (हेल्प डेस्क) ८ सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहे.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ९ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीत तडजोडीने प्रलंबित खटले तडजोडीने मार्गी लावण्यात येतात. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून वाहनचालकांसाठी मदत केंद्र सुरू (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहे.
वाहनचालकांसाठी हे मदत केंद्र ८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत मदत केंद्राचे कामकाज सुरू राहणार आहे. प्रलंबित खटला, थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. वाहनचालकांना दंडाच्या रकमेतून सूट देण्यात येणार आहे. मदत केंद्रात न्यायालयातील पॅनल असणार आहे, असे मगर यांनी नमूद केले.
वाहनचालकांना सहकार्य करण्यात येणार
वाहतूक पोलिसांच्या मदत केंद्रात न्यायालयाचे पॅनल उपस्थित राहणार आहे. वाहनचालकांवरील थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंड कमी करून घेण्यासाठी वाहनचालकांना सहकार्य करण्यात येणार आहे. न्यायालयाने समन्स बजावलेले वाहनचालक दंड कमी करून घेण्यासाठी आले होते. काही वाहनचालकांनी स्वत: पुढाकार घेत मदत केंद्रात संपर्क साधला. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहर, तसेच अन्य शहरातील दंड कमी करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. दंड कमी केल्यानंतर संबंधित शहर, जिल्ह्यातील न्यायालयाला याबाबतची माहिती देखील कळवण्यात येणार आहे. - विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा