प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : महाबळेश्वरजवळील भिलार या पुस्तकांच्या गावात आता विविध उपक्रमांसाठी उपयुक्त असे अॅम्फी थिएटर साकारत आहे. एमआयडीसीच्या मदतीने हे ओपन थिएटर बांधले जात आहे. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने अॅम्फीथिएटरची सुरुवात केली जाणार आहे.भिलारमध्ये कथा, कादंबरी, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, भूगोल, प्रवासवर्णने असे साहित्यातील सर्व प्रकार सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध झाले आहेत. पुस्तकांचे गाव साकारल्यानंतर लगेचच अॅम्फीथिएटरची संकल्पना पुढे आली. या ओपन थिएटरचे डिझाईन आणि कामासाठी आवश्यक असलेला निधी यासाठी एमआयडीसीने पुढाकार घेतला आहे.सध्या सभागृहाचा पाया बांधून पूर्ण झाला असून, येथे तिन्ही बाजूंनी आसन व्यवस्था, मधोमध सादरीकरणासाठी व्यासपीठ आणि दोन ग्रीनरुम असा आराखडा तयार झाला आहे. एकावेळी २०० रसिक येथील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतील, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर यांनी ‘लोकमत’ला दिली. प्रकाशक, लेखकांनी पुस्तकांच्या गावी जाऊन आपल्या पुस्तकांचे प्रकाशन करावे, अशी त्यामागील संकल्पना आहे.
पुस्तकांच्या गावी साकारतेय ‘अॅम्फी थिएटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:14 AM