कामशेत : नऊ वर्षांपूर्वी ( १३ फेब्रुवारी २०१० ) रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अनेकांचे बळी गेले. तर या बॉम्बस्फोटातून बचावलेल्या व गंभीररीत्या जखमी झालेल्या एका युवतीने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरावरील वेदनांवर विजय मिळवला. आपल्याला भेटलेले ह्या नवीन जीवनाचे सार्थक करण्यासाठी जगाला शांततेचा संदेश देण्याचा मानस केला. आणि फ्लाय फोर पिस म्हणत जगाला शांततेचा संदेश देत कामशेत शहराजवळील डोंगरावरून बुधवार ( दि. १३ ) पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून अवकाशात उतुंग भरारी घेतली.१३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात बचावलेली आम्रपाली चव्हाण ही युवती जखमी झाली होती. ( आम्रपालीला ६० टक्के अपंगत्व आले होते व ती ५४ टक्के भाजली होती. ) या बॉम्बस्फोटात झालेल्या आघातावर ती सुमारे ६० दिवस आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. यावेळी आम्रपाली वर सुमारे सात मोठ्या शस्त्रक्रिया आणि तीनशे विनाशस्त्रक्रिया व उपचार झाले आहेत. यातून सावरत ती पुन्हा जगण्यास सज्ज झाली. आपल्याला मिळालेले बोनस आयुष्य जगताना जगाला शांततेचा संदेश देण्याचा उद्देश मनाशी बाळगून अम्रापालीने जीवनाची नवीन सुरुवात केली.आपण अपंग असून सुद्धा पॅराग्लायडिंग या साहसी प्रकारातून आकाशात उंच भरारी घेत तिने जगाला शांततेचा संदेश दिला आहे.यावेळी तिला ऑरेंज लाईफ ऍडव्हेंचर चे विजय सोनी, सुभाष शेवाळे, सनी कोळेकर, विकास आंद्रे, सौरव आंद्रे, अविनाश जाधव आदींनी प्रशिक्षण दिले. अम्रापालीच्या गगन भरारीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तर पुढील मोहिमेत तिने माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प केला आहे. तर तिचे साहस व जिद्द पाहून प्रोत्साहित झालेल्या ध्रुव सायखेडकर या १३ वर्षाच्या मुलानेही यावेळी साहसी पॅराग्लायडिंग करून तिच्या कार्यात सहभाग घेतला. पॅराग्लायडिंग करणारा ध्रुव सायखेडकर हा सर्वात तरुण मुलगा ठरला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ध्रुव फौंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. कामशेत जवळील पिंपळोली गावाच्या हद्दीत झालेल्या कार्यक्रमात सुचारिता कनकरत्नम, यशवंत मानखेडकर, सुबोध सायखेडकर, रुपाली सायखेडकर, पिंपळोली गावच्या सरपंच रेश्मा संदीप बोंबले, पोलीस पाटील दिपाली मानकु बोंबले, ताजे गावाचे पोलीस पाटील गंगाराम केदारी, कामशेत पोलीस ठाण्याचे राम कानगुडे, दत्ता शिंदे आदींसह ग्रामस्थ व लहान मुले, मोठ्या संख्येने उपस्थित होते.-------------मी उंच भरारी घेतली आहे, कारण मला आतंकवाद्यांना दाखवून द्यायचं आहे कि आम्ही भारतीय कोणालाही घाबरत नाही. आतंकवादीनी बॉम्बस्फोट करून काय मिळवले, आम्ही भारतीय जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी आलो आहोत.- आम्रपाली चव्हाण
आम्रपाली चव्हाण यांची जागतिक शांततेसाठी भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:39 PM