पुणे : सोशल मीडियावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरून युद्ध पेटले आहे. फडणवीस यांच्या विधानाचा निषेध म्हणून काल पिंपरीत शिवसेनेच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनाला त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या या ट्विटवरून शिवसेनेतून तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावरून पिंपरी येथील शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारले होते. त्यावेळी राघोबादादा तुमच्या आनंदीबाईंना आवरा अशीही घोषणाबाजी करण्यात आली.
त्यावर आता फडणवीस यांनी आंदोलनाचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुकपेजवर शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे अशा शायरीतून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर You don’t lead people by hitting people over the head, that’s assault - not leadership CM Uddhav Thackeray अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवला आहे.लोकांच्या डोक्यावर मारून त्यांचे नेतृत्व करता येत नाही, तो हल्ला होते, नेतृत्वगुण नव्हे अशा शब्दांत आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा उल्लेख करून फडणवीस यांनी आपली पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
दरम्यान काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अमृता या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत, अनेकदा त्याचे परिणामही त्यांना सोशल मीडियावरून भोगावे लागले आहेत. मात्र त्या राजकारणात येतील असे वाटत नाही' अशा शब्दांत आपले मत मांडले.