पुणे - राज्य सरकारने 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंध हटवले असून रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वगळण्यात आलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे, पुणेकर व्यापारी सरकारवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रशासन व राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. तसेच, येथील स्थानिकांनाही धरणे आंदोलन करण्याचे सूचवले आहे.
अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्या बोलता होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करून खरेदी करावी. राज्यात अनेक ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे व्यवहार सुरू झाले आहेत. पुण्यात फक्त ४ टक्के रुग्णसंख्या असतानाही पुणे खुलं का झालं नाही? मुंबईतील निर्बंध हटवण्यात आले आहेत, तर पुण्यातील का नाही? त्यासाठी तुम्ही धरणे धरायला पाहिजे”, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना केलं.
कधी कधी समोरच्याला पटवून द्यायला आपल्याला धरण्यावर उतरावं लागतं. पुण्याला आता ओपनअप करायची वेळ आलेली आहे, पुण्यातील जी दुकानं आहेत, कमर्शियल पॉईंट आहेत, त्यांबाबत एक धोरण बनवून ती खुली करायला हवीत, असाच सल्ला मी देईन, असे अमृता फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.
पवार-शहा भेटीबाबतही मांडलं मत
शरद पवार आणि अमित शहा यांच्या दिल्लीतील भेटीबाबतही अमृता यांनी मत व्यक्त केलं. दिल्लीत जे नेते भेटले आहेत, ते यापूर्वीपासूनच भेटत आहेत, ते आजच भेटले असं नाही. मात्र, एमव्हीए हे सरकार खूप कमकुवत आहे, ते कधी पडते याचा ध्यास सगळ्यांना लागलाय. हे सरकार पडल्यास भाजपा चांगला पर्याय देईल, असेही अमृता यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट
अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्या नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. पूरग्रस्तांसाठी दिलेल्या पॅकेजसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुनही त्यांनी, या पॅकेजमध्ये महावसुली नाही झाली तर बरं, असे म्हणत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अमृता यांच्या या उत्तरानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कोणती गोष्ट किंवा काम तुम्हाला आवडलं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावरही, त्यांनी चांगलाच टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील हे तिन्ही पक्ष एकत्रपणे एकमेकांची पाठ ज्या पद्धतीने खाजवतात ते मला खूप आवडतं, असे अमृत यांनी म्हटले.
गणेच चतुर्थीच्या अगोदर नवं गाणं
अमृता या गायिक असून यापूर्वी त्यांचे अनेक गाणे रिलीज झाले आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता, तुमचं पुढचं गाणं कधी? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी माहिती दिली. गणेश चतुर्थीच्या अगोदर माझं नवीन गाणं येतंय, हेही अमृता यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं.