" काम एक करतं अन् हार दुसरेच घालून जातात.."; पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून अमृता फडणवीसांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 05:30 PM2021-08-05T17:30:22+5:302021-08-05T17:57:47+5:30
पुण्यातील मेट्रोच्या ट्रायल उद्घाटनावरून रंगलेल्या श्रेयवादावर भाजप आणि आघाडी सरकारमध्ये जोरदार कलगीतुरा सुरु आहे.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोच्या 'ट्रायल रन'चं उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंदक्रांत पाटील यांनाही निमंत्रण न दिल्यामुळे चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. तसेच पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून आघाडी सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहे. आता या वादात अमृता फडणवीसांनी उडी घेतली असून '' काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात'' अशा शब्दात पुणे मेट्रोच्या 'ट्रायल रन' उद्घाटनावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
यापूर्वी पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम मेट्रो कंपनीला खडे बोल सुनावले होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे दबावाखाली काम करायचं असेल तर आम्हालाही दबाव टाकता येतो. मोदींनी सर्व परवानग्या दिल्या, केंद्राने ११ हजार कोटी दिले आणि मोदींचा साधा फोटोही नाही ? आम्ही काय फुकटचं मागतोय का? तुम्हाला सगळं फुकट हवंय. माझ्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन मी नाही तिथे? यापुढे असं केलं तर खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता.
पुण्यात अमृता फडणवीस एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी चालू घडामोडींवर आपली रोखठोक मतं व्यक्त केली. तसेच पुणे मेट्रोच्या श्रेयवादावर भाष्य करतानाच राज्य सरकारच्या कामकाजावरही जोरदार टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याला सरकारकडून विरोध होत असल्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाल्या, राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा असून, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील. हा त्यांच्या मनात राग असेल, त्याबद्दल मला माहिती नाही. पण असे व्हायला नको असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
त्यावेळी भाजपा चांगला पर्याय देईल.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अमृता फडणवीस या एका कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. फडणवीस म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुमकुवत आहे. आणि हे सरकार कधी पडेल याचा काही नेम नाही. हे सरकार पडावं असा ध्यास प्रत्येकाला लागला आहे. पण ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी भाजपा चांगला पर्याय देईल.
गणेश चतुर्थीच्या अगोदर नवं गाणं
अमृता फडणवीस या प्रोफेशनली गायिका असून यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता, तुमचं पुढचं गाणं कधी? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी माहिती दिली. गणेश चतुर्थीच्या अगोदर माझं नवीन गाणं येतंय, हेही अमृता यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, गणेशोत्सव आणि पुणे हे फार जुनं नातं आहे.
पुण्याला ओपनअप करायची वेळ आलीय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करून खरेदी करावी. राज्यात अनेक ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे व्यवहार सुरू झाले आहेत. पुण्यात फक्त ४ टक्के रुग्णसंख्या असतानाही पुणे खुलं का झालं नाही? मुंबईतील निर्बंध हटवण्यात आले आहेत, तर पुण्यातील का नाही? त्यासाठी तुम्ही धरणे धरायला पाहिजे”, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना केलं. कधी कधी समोरच्याला पटवून द्यायला आपल्याला धरण्यावर उतरावं लागतं. पुण्याला आता ओपनअप करायची वेळ आलेली आहे, पुण्यातील जी दुकानं आहेत, कमर्शियल पॉईंट आहेत, त्यांबाबत एक धोरण बनवून ती खुली करायला हवीत, असाच सल्ला मी देईन, असे अमृता फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.