पुणे : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मी नेहमीच प्रचारासाठी जाते. तशी या वेळीही जाईन’, असे सांगतानाच, ‘केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे मी वैयक्तिकरित्या स्वागत करते. गेली कित्येक दशके प्रलंबित असणारा काश्मीर प्रश्न यामुळे मार्गी लागण्याची आशा वाटते’, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले. पुण्यातील सहकारनगर येथील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी खास महिला क्रिकेटपटूंना समर्पित विभागाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’चे संस्थापक रोहन पाटे, उषा काकडे, अम्रिता पाटे आदि उपस्थित होते.
महिला क्रिकेटपटूंसाठी समर्पित असणा-या विभागात सध्या भारताच्या विविध आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचे ‘वन डे टी-शर्ट्स’ लावण्यात आले आहेत. यात झुलून गोस्वामी, राजश्री गायकवाड, जेमिमा रॉड्राग्ज, पूनम यादव, दीप्ती शर्मा, एकता बिष्टा आदींचा समावेश आहे.‘एखाद्याचा छंद त्याची ‘पॅशन’ बनते, तेव्हाच असे संग्रहालय निर्माण होऊ शकते. महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र विभाग उभारल्याने क्रिकेटचे हे संग्रहालय ख-या अर्थाने परिपूर्ण झाल्यासारखे वाटते.’, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.